पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक संपताच शहरामध्ये अवैध धंद्यांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. कष्टकर्यांच्या उद्योगनगरीत आता निर्भयता हरवत चालली आहे. महापालिकेत सत्ता परिवर्तन झाले असले तरी शहर भयमुक्त कधी होणार? याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागलेले आहेत. खून, हाणामारी, सशस्त्र हल्ले, चोरी, लुटमार यासारख्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिस प्रशासन गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात पूर्णपणे अपयशी झाले आहे. शहरात दारू, मटका, जुगार बंद असल्याचा दावा पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी शहरात ठिकठिकाणी चोरी-छुप्या पद्धतीने हे अवैध धंदे राजरोसपणे सुरूच आहेत. विशेष म्हणजे, अशा अवैध धंद्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या घटना घडत असूनही पोलिस सारे काही आलबेल असल्याचे सांगत आहेत.
कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे
आठवडाभरापूर्वी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर सशस्त्र टोळक्याने हल्ला केला. टोळक्यातील काहींनी हातामध्ये गावठी कट्टे, तलवारी, कोयते घेऊन हल्ला चढवला. यावेळी रस्त्यावरून जाणार्या एका नागरिकावरदेखील या टोळक्यातील तरुणांनी वार केले. मात्र, या घटनेनंतरही पोलिसांनी असा हल्ला झालाच नसल्याचे सांगून आपले अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये असलेल्या निगडी जकात नाका बॉर्डर, रावेत, किवळे, देहूरोड या भागात अशा प्रकारचे हल्ले नित्याचेच झाले होते. गेल्यावर्षी किवळे येथील जुगार अड्ड्यावर दीड कोटींचा दरोडा पडल्याची चर्चा आहे. अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
गुन्हेगारांचा मोर्चा शहर हद्दीत
पुणे ग्रामीण भागात रुजू झालेल्या सध्याच्या ‘सिंघम’ पोलिस अधिकार्यामुळे बेकायदा धंद्यांवर काहीअंशी लगाम बसला आहे. त्यामुळे गुन्हेगारांनी आपला मोर्चा पुणे शहर हद्दीकडे वळवला असून, अनेक गुन्हेगारांचे पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत भागीदारीत अवैध धंदे सुरू आहेत. महिनाभरापूर्वी हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पाठलाग करताना खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू झाला. मात्र, हा मृत्यू हृदयविकाराचा झटक्याने झाला आहे, असा दावा पोलिसांनी केला. हे काही अंशी खरे असले तरी पोलिसांनी दिलेल्या अभयमुळेच हे धंदे राजरोसपणे सुरू असून, पोलिस मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप तेव्हा मयताच्या नातेवाईकांनी केला होता.
पोलिसांचा दावा फोल
शहरामध्ये अवैध धंदे बंद असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. परंतु चिंचवडमध्ये मटका अड्ड्यावर झालेला हल्ला, झोपडपट्टी भागात सुरू असलेली अवैध दारुविक्री, निगडी ओटास्किम भागात विकला जाणारा गांजा, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात सहज उपलब्ध होणारे अंमली पदार्थ, यावरून पोलिसांचा दावा फोल ठरत आहे. पोलिसांचे अभय असल्यानेच शहरात अवैध धंदे वाढले आहेत, असा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल राजकीय नेतेमंडळीदेखील तोंड उघडत नसल्याने उद्योगनगरीत गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढतच आहे.
मिलीभगत धंदेवाल्यांशी
अवैध धंदे सुरू करण्यासाठी पोलिसांच्या मर्जीतील पोलिस कर्मचार्याला (वसुली पंटर) हाताशी धरले जाते. त्यानुसार टक्केवारीची बोलणी झाल्यावर धंदा सुरू केला जातो. यामध्ये अनेक बड्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचेदेखील हात दगडाखाली अडकलेले आहेत. दरवर्षी महागडा मोबाईल, कपडे, शूज अशी खैरात सुरू असते. वाढदिवस, लग्न समारंभ यासारख्या सोहळ्याचा खर्च-पाणीदेखील हीच मंडळी करत असल्याची खात्रीशीर माहिती आहे.