पिंपरी-चिंचवड : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे रविवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, नागपूर, कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या असंघटित कामगारांनी सहभाग नोंदविला होता. मोर्चानंतर नगरविकास मंत्री रणजित पाटील यांची भेट घेऊन आंदोलकांच्या शिष्टमंडळाने कामगार, कष्टकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मागण्यांचे निवेदनदेखील त्यांना देण्यात आले. सरकार सामान्य व गरीबांच्या विकासासाठी कटीबद्ध असून, बांधकामे नियमितीकरण, झोपडीधारकांना घरे व फेरीवाला कायद्याबाबत सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे. या विषयांबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या जातील, असे आश्वासन मंत्री रणजित पाटील यांनी दिले.
आंदोलनात यांचा सहभाग
कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात अनिल बारवकर, राजू बिराजदार, साईनाथ खंडीझोड, इरफान चौधरी, सुरेश देंडे, दीपक पाचपुते, गणेश शिंदे, ज्ञानदेव लगाडे, इरफान मुल्ला, नागनाथ लोंढे, शशिकला ढवळे, जयश्री निरवने, पार्वती शिंदे, अरुणा सुतार, सरिता वाढोरे, मीना जाधव, राजू हाके, कासिम तांबोळी, उमेश डोर्ले, अनिल मुकी, शेषनारायण खंकाळ, संजय यवलेकर, हणमंत चाल्लावर, नारायण कलाल, सय्यद अली, विजय सूर्याशी, नदीम पठाण, पोपट सकट, विनोद मोरया, ओमप्रकाश मौर्या, लक्ष्मण कोरे, सखाराम केदार सहभागी झाले होते.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
कष्टकर्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा, म्हातारपणी पेन्शन लागू करा, पथ विक्रेता कायद्याची राज्यात सक्षम अंमलबजावणी करा, सामान्यांची अनधिकृत घरे नियमित करा, सर्व शासकीय जागांवरील झोपडीधारकांचे सरसकट सर्वेक्षण करून पक्की घरे द्या, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष, आमदार कपिल पाटील, आमदार विद्या चव्हाण, आमदार हरिभाऊ राठोड यांनी आंदोलकांना संबोधित करत आपला पाठिंबा दर्शविला.