धुळे । डॉ.भामरे यांनी आ. अनिल गोटे यांच्या विरोधात काल केलेल्या वक्तव्याचा आ. गोटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे समाचार घेतला आहे. यात त्यांनी डॉ. भामरे यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी दिशा देतो, दिशाभूल करीत नसल्याचे आ. गोटेंनी स्पष्ट केले आहे. पत्रकात आ. गोटे यांनी त्यांना राजकीय वारसा नसल्याचाच आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी जे काही मिळविले आहे ते त्यांनी स्वतःच्या कष्टावर, हिंमतीवर आणि लोकांच्या प्रेमावर मिळविले असून बापजाद्यांच्या पुण्याईवर नसल्याचा अप्रत्यक्ष टोला डॉ. भामरे यांना लगावला आहे.
नाथाभाऊंनी दिली उमेदवारी
सहा महिन्यापुर्वी मी प्रचार करावा म्हणून माझ्या घराचे उंबरठे चाटणार्यांची जिभ माझ्या विरुध्द वळतेच कशी? असा प्रश्न वरिष्ठ नेत्यांच्या मनात निर्माण झाला असल्याचे पत्रात आ. गोटे यांनी म्हटले आहे. शेवटी माझ्याविरुध्द जे विष ओकणारे तेच माझ्या कामी आले. मा.नाथाभाऊंनी त्यांच्या बंगल्यावरुन बोलावून मला उमेदवारी दिली असे पत्रकात म्हटले आहे.
मोदी लाटेमुळे बहुमत
डॉ. भामरेंचा क्षुद्रपणाचा पहिला परिचय इंदिरा गार्डन जवळील सभेच्या वेळी झाल्याचे पत्रात म्हटले आहे. नाथाभाऊंनी उमेदवारी दिली मी कधीही ‘खाटेवर झोपून लाटेचे राजकारण केले नाही ’ असे म्हटले आहे. धुळे लोकसभा मतदार संघातून केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी साहेबांच्या लाटेमुळे डॉ. भामरेंना प्रचंड बहुमताने जनतेने निवडूनदिले. खरेतर, स्वतःच्या वॉर्डात निवडून येण्याची तुमची पात्रता नसल्याचा आरोप आ. गोटेंनी केला आहे.
मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाचे श्रेय
अक्कलपाडा धरणाचे श्रेय घेण्याचा हलकटपणा आ. गोटे यांनी केला नसल्याचे सांगितले आहे. जामफळ या प्रश्नासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे त्यांना सांगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाचे श्रेय स्वतः लाटण्याचा मुर्खपणा आपण करणार नसल्याचे सांगून याचे सर्व जनतेचे असल्याचे म्हटले आहे.