बापू बांगर : चालू घडामोडी अध्यापन मार्गदर्शन कार्यशाळा
बारामती । परिस्थिती नेहमी आपल्या बाजूनेच असेल असे समजावण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, आहे त्या परिस्थितीतील संधी शोधून मार्ग काढला पाहिजे. यातूनच यश हे आपल्या हातात येत असते. त्यासाठी कष्ट, जिद्द व आत्मविश्वास ठाम असला पाहिजे. याचा अर्थ असा की, तुमच्या हातात यश नक्कीच आहे. त्यामुळे निराश न होता परिस्थितीला सामोरे जायला पाहिजे, असे प्रतिपादन बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी केले आहे. युनिक अकॅडमीच्यावतीने आयोजित केलेल्या चालू घडामोडी अध्यापन मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी परिस्थितीवर मात केलेल्या पुष्पांजली पवार यांचा बापू बांगर व देवा जाधवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक देवा जाधवर, लक्ष्मणराव भोसले, उमेश रूपनवर, बाबुराव पडळकर, वसंत घुले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्याती काळे तर प्रास्ताविक भूमिका वसंत घुले यांनी मांडले.
वृत्तपत्रांचे वाचन करा
चालू घडामोडी हा विषय अत्यंत खोलवर समजून घेतला पाहिजे. देशात व जगात घडणारी प्रत्येक घटना ही चालू घडामोडीतच मोडते. यासाठी वृत्तपत्रांचे वाचन चांगल्या प्रकारे केले पाहिजे. वृत्तपत्रातील बातमीला अनेक कंगोरे असतात हे कंगोरे ज्यांना समजतात त्यांचा दृष्टिकोन हा निरीक्षणवादी बनत असतो. यासाठी महत्त्वाच्या घटना समजून घेतल्या पाहिजेत. सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षणही चांगल्याप्रकारे करता आले पाहिजे. यावरून आपण अनेक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवित असतो, असे मत चालू घडामोडीचे अभ्यासक देवा जाधवर यांनी व्यक्त केले.
अपयशातून मिळते चांगली शिकवण!
बदललेला काळ व परिस्थिती समजावून घेतली पाहिजे. ही परिस्थिती तुम्हाला निर्णायक भ्ाूमिकेकडे घेऊन जात असते. ज्यांनी-ज्यांनी परिस्थितीला आवाहन देत उत्तम प्रकारे करिअर केले आहे. तेच आपले मार्गदर्शक असतात. परंतू अपयशी ठरलेले लोकही बरेच काही शिकवून जातात. त्यांना नाकारू नका. त्यांना बरोबर घ्या. चुकांमुळे खूप काही शिकता येते, याचे भानही स्पर्धापरीक्षा करणार्यांनी ठेवावे, असे बांगर यांनी यावेळी सांगितले.