कसबावासीयांचे 15 दिवसांपासून उपोषण

0

बारामती । निरा रोड नजीकच्या जामदार रोड येथील वसाहतीत नागरी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी कसबा येथील रहिवासी बारामती नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या भागातील रस्ता व गटारीच्या कामाचे टेंडर निघाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही, या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम आहेत.

गैरव्यवहारांची चौकशी
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व या परिस्थितीचा आढावाही घेतला. या भागात 150 च्या वर कुटुंबे राहत असून नगरपालिका सुविधा देण्यास टाळाटाळ करीत आहे. या प्रश्‍नासाठी जिल्हाधिकार्‍यांना लक्ष्य देण्यास सांगणार असून हा प्रश्‍न निश्‍चितपणे सोडवला जाईल. नगरपालिकेच्या गैरव्यवहारांची चौकशी करावी लागेल, असे गिरीश बापट यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. परंतु उपोषणकर्ते निर्णयावर ठाम आहेत.

उपोषणकर्त्यांकडे भाजपची पाठ
नगरपालिकेच्या हद्दीतील प्रश्‍न असतानादेखील भाजपचे शहराध्यक्ष या उपोषणाच्या ठिकाणी फिरकलेदेखील नाहीत. तसेच भाजपचे तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी याठिकाणी भेट देण्यास आले नाहीत. हा सार्वजनिक प्रश्‍न असतानादेखील यात राजकारण आणले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. यावरून तालुक्यातील भाजपमध्ये निष्ठावंत व बाहेरून आलेले असे दोन गट पडलेले दिसून येतात. बारामती तालुक्यात भाजपामध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पदाधिकारी असतानादेखील या प्रश्‍नात लक्ष्य देण्यास त्यांना वेळ नाही. किंवा ते कोणाचे तरी बटीक आहेत असा उपरोधिक टोलादेखील एका उपोषणकर्त्याने लगावला.

खासदार कधी उपलब्ध होणार?
बारामती शहरातील भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे दुरध्वनी घेत नाहीत. व ते बारामतीत येतात तेव्हा फक्त एकाच पदाधिकार्‍यास माहीत पडते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी खासदार उपलब्ध कधी होणार? असा प्रश्‍नदेखील एका माजी पदाधिकार्‍याने दै. जनशक्तिशी बोलताना केला. खासदार अमर साबळे यांनी पुणे जिल्ह्यासाठी विशेषत: बारामतीसाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा व बारामतीतील असंख्य प्रश्‍नांची सोडवणूक करावी, भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नगरपालिकेचे दुर्लक्ष
उपोषणासंदर्भात येत्या 20 ऑगस्टला बारामती नगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असून उपोषणकर्तेदेखील या बैठकीस हजर राहतील. या प्रश्‍नाची नक्कीच सोडवणूक करण्यात येईल, असे खासदार साबळे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान बारामती शहराच्या अगदी मध्यवर्ती चाललेले हे उपोषण तालुका व परिसरात चांगलेच चर्चेचा विषय बनले आहे. बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात या गैरसोयी असतानादेखील नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.