मुक्ता टिळक विधानसभेच्या प्रबळ दावेदार असल्याची चर्चा
पुणे : महापौर मुक्ता टिळक यांनी पाणी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन कसबा मतदारसंघातून आपणही विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याची झलक दाखविल्याची भारतीय जनता पक्षात जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री गिरीश बापट लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे बापट यांनी लोकसभा लढविली तर रिकाम्या होणार्या जागेवर जोरदार रस्सीखेच सुरू होणार आहे.
टिळक यांनी शहराच्या पाण्यात कपात करणार्या जलसंपदा अधिकार्यांना ‘गांधीगिरी’ मार्गाने जेरीस आणत पुणेकरांच्या पाणीप्रश्नावर गेल्या आठवड्यात षटकार ठोकला. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे स्वपक्षीयांसह विरोधकांच्या ‘विकेट’ त्यांनी घेतल्या. या पार्श्वभूमीवर टिळक या कसबा मतदारसंघातून विधानसभेच्या प्रबळ दावेदार ठरू शकतात, अशीही चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात कसबा मतदारसंघात भाजपला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यात टिळक या महापालिका निवडणुकीत शहरात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. त्यामुळे टिळक यांची विधानसभेची दावेदारी कसब्याच्या राजकारणात रंग भरणारी आहे.