कसली स्मार्ट अन् कसली सिटी!

0

श्रीमंत म्हणून बिरुदावली मिरवणारी पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. मात्र, तरीही महापालिका पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकार्‍यांना स्मार्ट सिटीची स्वप्ने पडत आहेत. सध्या काही प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याची बोंब आहे, तर काही प्रभागांमध्ये कचर्‍याच्या समस्येने डोके वर काढले आहे. अंतर्गत रस्त्यांविषयी तर न बोलणेच बरे. पदाधिकार्‍यांना मात्र, याचे सोयरसूतक नाही. आपला रुबाब, पद मिरवण्याशिवाय त्यांना दुसरे काही सुचेल तर शप्पथ. महापालिका वर्तुळ म्हणजे शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू.

आता तर या वर्तुळाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. तसा माहोलही तयार होऊ लागला आहे. नेतेमंडळीच पुढच्या तयारीला लागल्याने कार्यकर्त्यांना तरी दुसरे काही सुचेल, याची कल्पना करणेही मूर्खपणाच. मग सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांवर विचार करण्यास वेळ आहे तरी कोणाला. त्यांना सोयी-सुविधा मिळो अगर न मिळो, काही देणे-घेणे नाही. सोयी-सुविधांच्या नावाने बोंब आणि स्वप्ने पडताय स्मार्ट सिटीची. विकासकामे, मूलभूत सोयी-सुविधांचे योग्य नियोजन, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच खर्‍या अर्थाने स्मार्ट सिटीकडे वाटचाल होऊ शकते. मात्र, पिंपरी-चिंचवडकरांचे दुर्दैव. शहरवासीयांना हव्यात मूलभूत सोयी-सुविधा. त्यांना त्या मिळाल्या तर ते आपोआपच आपले शहर स्मार्ट समजतील. हे मात्र, नक्की.
-प्रशांत भदाणे, पिंपरी-चिंचवड