इस्लामाबाद । मायदेशात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करत असलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ पुन्हा बरळले आहेत. यावेळी त्यांनी कसाबपेक्षा कुलभूषण जाधव खतरनाक असल्याचे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव प्रकरणात दिलेला निर्णय पाकिस्तानात पचनी पडलेला नाही. त्यामुळे मुशरर्फ यांनी हे वक्तव्य करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
पाकिस्तानी वृत्तवाहिनी एआरवायशी बोलताना मुशरर्फ म्हणाले की, मुंबई हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेला अजमल कसब हा एक प्यादे होता. पण, कुलभूषण जाधव हा दहशतवादाला खतपाणी घालत होता, त्याने अनेकांना मारले असते अशी मुक्ताफळे उधळली आहेत.
मुंबईवर दहशतवादी हल्ला करून 164 निष्पाप नागरिकांचा बळी घेणार्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब हा एक क्रूरकर्मा होता. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, त्याच्यावर खटला चालवून भारताने त्याला फासावर लटकवले हे मुर्शरफ विसरले का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. या विधानातून कसाब हा एक दहशतवादी होता हे त्यांनी नकळत मान्य केल्याचे दिसत आहे. नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवून, पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत मजल मारणार्या मुशरर्फ यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जायलाच नको होते, असे विधानही केले आहे.