ठाणे – मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे जाणार्या मार्गावर जुन्या घाटात रविवारी सकाळी 6.00 वाजण्याच्या सूमारास दरड कोसळली. सकाळी कोसळलेल्या दरडीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला नसला तरी या मार्गावरुन वाहतूक करणार्या प्रवाशांना एकेरी वाहतूकीवरच अवलंबून रहावे लागले होते. परिणामी या रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी दगड माती बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र कोणतीही हानी झाली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार
पावसाळ्यात कसारा घाटात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महामार्गावर दरडी कोसळण्याच्या संवेदनशील ठिकाणी संरक्षक जाळी अद्यापी बसविण्यात आलेली नसल्याचे वाहन चालक सांगत आहेत. या महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी या मार्गावर घोटी आणि पडघा येथे प्रवाशांकडून टोल वसुल करणार्या गॅमन इंडिया कंपनीकडे सोपविण्यात आलेली आहे. मात्र कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र कसारा घाटात पाहायला मिळत आहे.