कसोटीचा रोमांच ९ फेब्रुवारीपासून

0

दुबई : न्यूझीलंड आणि इंग्लंडला पाणी पाजल्यानंतर आता बांगलादेशला एकमेव कसोटी सामन्यात मात देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. मायदेशात नुकतीच संपलेली इंग्लंडविरुद्धची मालिका यशस्वी ठरली आहे. विजयाची परंपरा पुढेही कायम राहील अशी अपेक्षा टीम इंडियाकडून व्यक्त केली जात आहे. यानंतर अनेक कसोटी मालिका खेळायच्या असल्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना इंग्लंड आणि त्याआधीचा न्यूझीलंड विरुद्धचा विजयी अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न राहील. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघदेखील या सामन्यात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहील. बांगलादेशच्या संघाला कमजोर लेखण्याची चूक टीम इंडियाला महागात देखील पडू शकते. संघांच्या क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानावर असून, बांगलादेश नवव्या स्थानी आहे. जर या सामन्यात बांगलादेशाने विजय मिळविला, तर त्यांना ५ मानांकन गुणांचा लाभ होईल. बांगलादेश संघात दर्जेदार आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे सामना रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.

अश्विन-जडेजामध्ये वॉर!
९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध लढण्यास सज्ज झाले असतानाच, दुसरीकडे मात्र भारतीय संघातील दोन प्रमुख फिरकी गोलंदाज ‘नंबर वन’ ठरण्यासाठी एकमेकांविरुद्ध झुंजतील. सध्या आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दोन स्थानी असलेल्या रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल. आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सध्या आश्विन अव्वल स्थानी विराजमान असून, त्याखालोखाल जडेजा द्वितीय क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आश्विन आणि जडेजा यांच्यामध्ये केवळ ८ गुणांचे अंतर असल्याने जडेजाला अव्वल स्थान काबीज करण्याची संधी आहे.

विजयी सातत्य कायम राखू: कुंबळे
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विजयी सातत्य कायम राखू, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांनी व्यक्त केला आहे. इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाला सापडलेली लय यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करीत कुंबळे पुढे म्हणाले की, मायदेशात नुकतीच संपलेली इंग्लंडविरुद्धची मालिका यशस्वी ठरली. विजयाची परंपरा पुढेही कायम राहील. यानंतर अनेक कसोटी मालिका खेळायच्या असल्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना इंग्लंड आणि त्याआधीचा न्यूझीलंड विरुद्धचा विजयी अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न राहील. त्यांनी स्पष्ट केले की, बांगला देश संघाने खेळात खूपच प्रगती केली आहे. न्यूझीलंडमध्ये निकाल थोडा वेगळा लागला तरी बांगलादेशची कामगिरी कमकुवत नव्हती. आम्ही प्रतिस्पर्धी संघाचा आदर करतो.

न्यूझीलंडमधील अनुभवाचा फायदा होईल: वॉल्श
या सामन्यासाठी बांगलादेशच्या गोलंदाजांना न्यूझीलंडमधील मिळालेल्या अनुभवाचा खूपच फायदा होईल, असे मत बांगलादेश संघाचे गोलंदाज प्रशिक्षक कोर्टनी वॉल्शने व्यक्त केले आहे. या कसोटीत बांगलादेश संघाची सत्वपरिक्षा राहील. बांगलादेश संघामध्ये नवोदित खेळाडूंचा सहभाग अधिक असल्याने त्यांना कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. तथापि बांगलादेश संघातील वेगवान गेंलंदाजांना न्यूझीलंडमधील मालिकेचा अनुभव थोडाफार मिळाला आहे. बांगलादेशच्या गोलंदाजांची न्यूझीलंडमधील कामगिरी समाधानकारक असून हैद्राबादच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांसमोर त्यांची सत्वपरिक्षा ठरेल, असेही वॉल्श म्हणाला. या एकमेव कसोटीसाठी बांगलादेशचा संघ चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करेल,. असेही वॉल्शने म्हटले आहे.

कर्णधार कोहलीकडून रहाणेची पाठराखण
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अजिंक्य रहाणेचे पुनरागमन झाले आहे. करुण नायरऐवजी मुंबईकर रहाणेला संघात स्थान देण्यात आले आहे. याबद्दलची माहिती संघाचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषदेत दिली. हैदराबादमध्ये गुरूवारपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळवला जाणार आहे. कोहली म्हणाला की, नायरने नक्कीच चांगली कामगिरी केली. पण रहाणेच्या एका खराब कामगिरीमुळे त्याचे दोन वर्षांचे कठोर परिश्रम दुर्लक्षित करता येण्यासारखे नाहीत. रहाणे भारताच्या कसोटी संघातील उत्कृष्ट फलंदाज आहे. रहाणेला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. रहाणेच्या जागी संधी मिळालेल्या करुण नायर याने दमदार कामगिरी करत त्रिशतक झळकावले होते. आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी रहाणे दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे संघात रहाणे की नायर यांच्यापैकी कोणाची निवड करायची असा प्रश्न व्यवस्थापनासमोर निर्माण झाला होता. अखेर नायरऐवजी यावेळी रहाणेला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.