सिडनी: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील तिसऱ्या कसोटीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने तुफानी फंलदाजी करत पहिल्या दिवसाच्या लंचच्या आधीच शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. अशी किमया करणारा वॉर्नर हा जगातील पाचवा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज बनला आहे. पाकिस्तानविरोधात सिडनीमध्ये खेळल्या जाणा-या मालिकेच्या तिस-या सामन्यातील पहिल्याच दिवशी डेव्हिन वॉर्नरने शतक पुर्ण केले. महत्वाचे म्हणजे पहिल्या दिवसाचा लंच होण्याआधीच डेव्हिड वॉर्नरने शतक ठोकत भीमपराक्रम केला. त्याच्या धुवाधार वनडे स्टाईल शतक तसेच सलामीवीर रेन्शोच्या नाबाद १६७ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवशी ३ गडी बाद ३६५ धावा केल्या आहेत. मालिकेत २-० ने पिछाडीवर असलेल्या पाकिस्तान संघासमोर हा सामना वाचवून इभ्रत वाचविण्याचे आवाहन आहे.
वॉर्नरसमोर सपशेल शरणागती
वॉर्नरने पाकिस्ताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाच्या लंचपर्यंत नाबाद 100 धावा केल्या. त्यानंतर तो 113 धावांवर बाद झाला. या कामगिरीनंतर वॉर्नर म्हणाला की, ‘या विक्रमामुळे आनंद झाला आहे. माझा हा फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.’ वॉर्नरने फक्त 78 चेंडूंमध्ये 17 चौकारांच्या मदतीने शतक पुर्ण केले. यासाठी त्याला फक्त 118 मिनिटे लागली. डेव्हिड वॉर्नरच्या या तुफानी खेळासमोर पाकिस्तानी गोलंदाजांनी सपशेल हार पत्करली होती. कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात शतक करणारा वॉर्नर पाचवा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा रेकॉर्ड करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. आपल्या शतकाचं रुपांतर मोठ्या धावसंख्येत करण्याची संधी मात्र वॉर्नरने गमावली. 113 धावांवर वॉर्नरने आपली विकेट गमावली. वहाब रियाजच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.
अनेक रेकॉर्ड मोडले
वॉर्नरच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून डॉन ब्रॅडमन यांनी 1930 साली असा कारनामा केला होता. तर 1976 साली पाकिस्तानच्या माजिद खान यांनी ही कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रंपरने 1902 साली मॅनचेस्टरमधील सामन्यात लंचपूर्वी 103 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच चार्ली मैकार्टनी यांनी 1926 साली लीड्समध्ये 112 धावा केल्या होत्या. वॉर्नरने या सगळ्यांचा विक्रम मोडीत काढत अवघ्या 78 चेंडूत शतक पूर्ण केलं. सिडनीच्या मैदानावरील हे आजवरचे सर्वात वेगवान शतक आहे. वॉर्नरने लंचआधीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आपले शतक पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नरच्या करिअरमधील हे 18 वे शतक ठरले.
भारत दौऱ्यासाठी दुबईत तयारी
भारताची चमकदार कामगिरी बघितल्यानंतर आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. आॅस्ट्रेलियाने भारत दौऱ्याच्या तयारीसाठी दुबईमध्ये उपखंडातील खेळपट्ट्यांवर सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. आॅस्ट्रेलियासाठी भारतात कसोटी विजय मिळविणे कठीण ठरले आहे. आॅस्ट्रेलियाला २००४ पासून भारतात एकही कसोटी सामना जिंंकता आलेला नाही. २०१३ च्या भारत दौऱ्यात त्यांना चार कसोटी सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आॅस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दुबई येथील अकादमीमध्ये शिबिर आयोजित करण्यास इच्छुक आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे हाय परफॉरमन्स मॅनेजर पॅट होवर्ड म्हणाले, ‘भारतात प्रत्येक ठिकाणी परिस्थिती समान नसते. आयसीसीने अलीकडच्या कालावधीत चांगले कार्य केले आहे. त्यांनी विविध शहरांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. त्यामुळे तेथे केवळ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्याच नाही तर विविध प्रकारच्या खेळपट्ट्या उपलब्ध आहेत. आम्हाला कुठल्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे, त्याची नक्कल करता येणार नाही, पण केवळ परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करता येईल. ’