नवी दिल्ली । कसोटी क्रिकेटला कंटाळवाणे क्रिकेट म्हणून संबोधण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. पाच दिवसांचा खेळ होऊनही सामन्याचा निकाल लागायचा नाही. पण 2017 हे वर्ष आतापर्यंत तरी कसोटी सामन्यांसाठी चांगले वर्ष ठरले आहे. यावर्षी खेळल्या गेलेल्या एकुण 37 कसोटी सामन्यांपैकी 33 म्हणजे जवळपास 89 टक्क्यांहून जास्त सामन्यांचे निकाल लागले आहे. त्यात दोन आंतरराष्ट्रीय संघामध्ये खेळल्या गेलेल्या सलग 22 सामन्यांच्या निकालाचाही समावेश आहे. केवळ 2017 मध्येच नाही तर मागील काही वर्षांपासून बहुतेक कसोटी सामने निकाली ठरले आहेत. 2014 पासून खेळवण्यात आलेल्या 168 कसोटी सामन्यांपैकी 140 कसोटी सामन्यांचा निकाल लागला आहे. याला टी 20 क्रिकेटचा परिणाम म्हणा किंवा आणखी काही निकाल लागत असल्यामुळे कसोटी क्रिकेटच्या भविष्यासाठी हे चांगले संकेत आहेत. मागील वर्षी एकुण 47 कसोटी सामने खेळले गेले. त्यातील 40 सामन्यांमध्ये निकाल लागलेला पहायला मिळाला. त्याआधी 2015 मध्ये 43 पैकी 34, 2014 मध्ये 41 पैकी 33 सामन्यांचा निकाल लागला होता.
टीम इंडियाने केली सुरुवात
यावर्षाच्या सुरुवातीला फेब्रवारी मार्च महिन्यात खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 25 मार्चपासून सुरुवात झाली. या मालिकेतील शेवटच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले. तेव्हापासून वेस्टइंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील नुकत्याच संपलेल्या दुसर्या कसोटी सामन्यापर्यंत सलग 22 कसोटी सामन्यांचे निकाल लागले आहेत. मात्र, 25 मार्च रोजी खेळला गेलेला द.आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. एप्रिल मे महिन्यात वेस्टइंडिजच्या दौर्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली होती. इंग्लंडने मायदेशात खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या मालिकेत द.आफ्रिकेवर 3-1 असा विजय मिळवला होता. जुलै महिन्यात श्रीलंकेने एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेला हरवले होते. त्याच महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौर्यावर गेला होता. श्रीलंकेत भारताने तीन्ही कसोटी सामन्यांमध्ये विजयाची पताका फडकवली होती. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात वेस्टइंडिजला इंग्लंड दौर्यात तीन सामन्यांमध्ये 2-1 असा पराभव पत्कारावा लागला होता. त्याच सुमाराला बांगलादेशाच्या दौर्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघालाही पराभवाची चव चाखायला लागली. मात्र, पहिल्या पराभवानंतर सावध झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसर्या सामन्यात बांगलादेशाला हरवून मालिका 1-1 अशी अनिर्णीत राखली.
यावर्षी 37 कसोटी सामने खेळले गेले त्यातील 33 सामन्यांचा निकाल लागला
सामन्यांचे एकुण निकाल पाहता हे वर्ष आतापर्यंत चांगले गेले आहे. यावर्षी आतापर्यंत 37 कसोटी सामने खेळले गेले आहे. त्यातील 33 सामन्यांचा फैसला झाला. केवळ चारच सामन्यांचा निकाल लागला नाही. यातील दोन सामन्यांमध्ये पाऊस खलनायक ठरला. द. आफ्रिकेच्या न्यूझीलंड दौर्यातील दोन सामन्यांचा पावसामुळे निकाल लागला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मालिकेतील रांचीमध्ये खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. फलंदाजांना पोषक असलेल्या या सामन्यातील खेळपट्टीवर पाच दिवसांंमध्ये केवळ 25 विकेट्स पडल्या. यावर्षातला चौथा अनिर्णीत सामना 2 नोव्हेंबर रोजी संपला. हा सामना वेस्टइंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. यावर्षी आणखी 10 कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
त्यात भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका, अॅशेस मालिकेतील चार सामने (या मालिकेतील पाचवा सामना जानेवारीत होणार आहे). न्यूझीलंड आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका आहे, तर झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या एका कसोटी सामन्याचाही यात समावेश आहे.