मुंबई । सीएसएमटी परिसरातून कस्टम विभागाने 4 कोटी रुपयांचा तस्करीचा मुद्देमाल जप्त केला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी कस्टम अधिकार्याला 10 लाख रुपयांची लाच दिल्याप्रकरणी 2 व्यक्तींना सीबीआयकडून अटक करण्यात आली. सीबीआयकडे ही तक्रार कस्टम विभागाचे सहायक आयुक्त दीपक पंडित यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईतील सीएसएमटी परिसरातून कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत मोबाइल फोनची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेला टेम्पो ताब्यात घेण्यात आला होता. ज्यात कस्टम विभागाला जवळपास 4 कोटी रुपयांचा तस्करीचा मुद्देमाल सापडला होता.
या संदर्भात ’अविस्ता मल्टी ट्रेड प्रायवेट लिमिटेड’ कंपनीचे संचालक राजेंद्र सिंग राजपुरोहित आणि मानव जगरवाल हे दोघेही कस्टम विभागाकडे आले असता त्यांनी या पकडण्यात आलेल्या मुद्देमालावर आपला हक्क सांगितला. यासंदर्भात कस्टम विभागाकडून राजेंद्र सिंग राजपुरोहित यांचा जबाबसुद्धा नोंदवण्यात आला होता. यासंदर्भात कस्टम ब्रोकर म्हणून काम करणारा हिमांशू अजमेरा याने मुंबई कस्टम कार्यालयात जाऊन संबंधित अधिकार्याला या प्रकरणात आपण अविस्ता मल्टी ट्रेड प्रायवेट लिमिटेडकडून आलो असल्याचे सांगत प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच देऊ केली. यासंदर्भात 10 लाख रुपयांच्या लाचेची तक्रार कस्टम विभागाकडून सीबीआयला देण्यात आल्यानंतर सापळा रचून सीबीआयच्या अधिकार्यांनी कस्टम ब्रोकर हिमांशू अजमेरा आणि मानव जगरवाल यांना अटक केली. यासंदर्भात संबंधित कंपनीच्या 3 ठिकाणच्या पत्त्यांवर छापा मारण्यात आला असून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.