कस्पटेवस्ती-बालेवाडी पुलासाठी निविदा प्रसिद्ध

0
संदिप कस्पटेंच्या पाठपुराव्याला आले यश
वाकड : पुणे महापालिकेने बालेवाडी ते वाकड, कस्पटे चौक दरम्यान सर्व्हे क्रमांक 46/47 जवळ मुळानदीवर पूल बांधण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. याठिकाणी पूल उभारण्यासंदर्भात प्रभाग क्रमांक 26, वाकड-पिंपळेनिलखचे भाजप नगरसेवक संदीप कस्पटे यांनी पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नगरसेवक संदिप कस्पटे यांनी 31 मार्च 2017 आणि 1 डिसेंबर 2017 रोजी पुणे महापालिका आयुक्तांना पत्र देऊन बालेवाडी ते वाकड, कस्पटे चौक दरम्यान मुळानदीवर पूल उभारण्याची मागणी केली होती. परंतु, याठिकाणी पूल उभारण्यासाठी जागा ताब्यात नसल्याने कस्पटे चौकातील रस्त्याला पूल जोडण्यास विलंब होत होता. त्यामुळे नगरसेवक संदीप कस्पटे यांनी जागेचे संबंधित शेतकरी आणि महापालिका प्रशासन यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यांच्याशी सुसंवाद साधला. तसेच बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला लवकरात लवकर देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
9 कोटींहून अधिक खर्च
पुणे महापालिकेने बालेवाडी ते वाकड, कस्पटे चौक दरम्यान सर्व्हे क्रमांक 46/47 जवळ मुळानदीवर पूल बांधण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. या पुलाच्या कामासाठी 9 कोटींहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका हा खर्च संयुक्तपणे करणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या हिश्श्याचा निधी पुणे महापालिकेकडे जमा केला आहे. मुळा नदीवरील या पुलामुळे पुणे महापालिका हद्दीतील बालेवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाकड आणि पिंपळेनिलख हा परिसर जोडला जाणार आहे. या पुलामुळे वाकड येथे पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.