कहाटुळला गुटख्यासह अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

0

असलोद । सध्या सर्वत्र कोरोनो व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. अशा बिकट परिस्थितीत शहादा तालुक्यातील कहाटुळ गावात गुटख्यासह अवैध दारु विक्रेत्यांच्या घरासमोर गाड्यांची गर्दी होत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्याचा गल्लीतील सर्वांनाच त्रास होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी असलोद ओ.पी.ला ग्रामपंचायततर्फे अर्ज देण्यात आला आहे.

कहाटुळ गावात सध्या महाराष्ट्राच्या सीमेलगत मध्यप्रदेशातून खेतीया, पानसेमल व इतर चोरमार्गाने अवैध दारुसह गुटखा विक्रेत्यांच्या घरापर्यर्ंत पोहचत आहे. त्यामुळे लोंढरे, धाद्रे, कवठळ, सोनवद, कमरावद, वडछील परिसरातील लोक दारुसह गुटखा विकत घेण्यासाठी गावात येतात. त्यामुळे विक्रेत्यांच्या घरासमोर गाड्यांची रांग लागत असल्याचे चित्र आहे. त्याचा गल्लीतील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

गावात स्वयंसेवक नेमले आहेत. त्यांनी समज देऊनही त्यांना विक्रेते जुमानत नाही. त्यांना समज देवुनही गुटखा, अवैध दारुची विक्री करीत आहे. गावात लॉकडाऊन सुरु असुनही येणारे लोक तोंडाला मास्क बांधत नाही. सोशल डिस्टनचे पालन करीत नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे सर्रास उल्लंघन होत आहे. गावात बाहेरुन येणार्‍यापासून कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे गावातील अवैध गुटखा व दारू विक्रेत्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच व पोलीस पाटील यांच्या स्वाक्षरीचा अर्ज असलोद ओ.पी.ला देण्यात आला आहे.