साक्री । तूर खरेदी बाबत शासनाने निष्क्रियता दाखविल्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाच्या या उदासीनतावादी धोरणाचा विरोध करण्यासाठी साक्री तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांना तुरीची बॅग व निवेदन देवून शासनाचा निषेध करण्यात आला.
आ.अहिरेंसह पदाधिकार्यांची उपस्थिती
यावेळी आमदार डी एस अहिरे, नगरपंचायत गटनेते ज्ञानेश्वर नागरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पोपटराव सोनवणे, साक्री तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप काकुस्ते, पंचायत समिती गटनेते उत्पल नांद्रे, साक्री विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप नांद्रे, नगरपंचायत बांधकाम सभापती सुमित नागरे, पंचायत समिती माजी उपसभापती नितीन बेडसे नगरसेवक राजेंद्र टाटिया व विजय भोसले आदी
उपस्थित होते.
तूर खरेदी करण्याची मागणी
गेल्या वर्षी तुरीची उत्पादकता कमी झाल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकर्यांना तूर लागवड करून उत्पादकता वाढविण्याचे आवाहन केले होते. यामुळे तालुक्यातील शेतकर्यांनीही तुरीची लागवड करून विक्रमी उत्पादन काढले. परंतु आता शासन शेतकर्यांकडील तूर खरेदीसाठी उदासीनता दाखवत असल्याने शेकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकर्यांचा हिताचा विचार करून शासनाने शेतकर्यांकडील तूर खरेदी करावी अशी मागणीही यावेळी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली.