अलवर : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत गुजरातची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सरसावलेल्या काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनाच निवडणूक उमेदवारीची ऑफर दिल्याचा दावा जशोदाबेन यांच्या एका नातेवाईकाने केल्याने गुजरातच्या राजकारणात याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, काँग्रेसची ही ऑफर जशोदाबेन यांनी नम्रपणे नाकारल्याचेही या नातेवाईकाने सांगितले.
गुजरातच्या आखाड्यात चर्चा
गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून, भाजपपुढे बर्यापैकी आव्हान उभे केले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. यामुळे गुजरात विधानसभेची निवडणूक चांगलीच गाजत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या नातेवाईकाने केलेल्या दाव्यामुळे आता यासंबंधीची चर्चा गुजरातच्या आखाड्यात चांगलीच रंगली आहे. काँग्रेसने जशोदाबेन यांनाच पक्षाकडून निवडणूक लढवण्याबाबत विनंती केल्याचे या नातेवाईकाने सांगितले आहे.
भाजप 130 हून अधिक जागा जिंकेल
जशोदाबेन बुधवारी अलवर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी महिलांचे शिक्षण आणि महिला सशक्तिकरणासह महत्त्वाच्या मुद्द्यावर उपस्थितांशी संवाद साधला. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप 130 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वासही जशोदाबेन यांनी व्यक्त केला. तुमचे आयुष्य देशासाठी समर्पित करा, असे जशोदाबेन यांनी मोदींना सांगितले आहे. मोदी हे महिलांचा आदर करतात. ते कधीतरी परततील असे जशोदाबेन यांना वाटते, त्यासाठी त्या प्रार्थना करतात, असे त्यांचे बंधू अशोक यांनी म्हटले आहे.