काँग्रेसचा कार्यकर्ता सक्षम करणार!

0

पुणे । आगामी वर्षात पुण्यावर लक्ष केंद्रित करून कार्यकर्ता सक्षम करणार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार अनंत गाडगीळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांना माझ्या संपर्क मोहिमेची कल्पना दिली आहे. 2018 या वर्षात घरोघर जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. पंधरवड्यातून एकदा कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार आहे. भेटी, बैठका यातून जनमताचा अंदाज येईल. त्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना देणार आहे. या संपर्कातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशावर प्रकाशझोत टाकणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. लोकसभेसाठी आपण इच्छुक आहात का? या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

पुणे शहरातही भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. स्मार्ट सिटी, मेट्रो अशा अनेक प्रकल्पांच्या घोषणा नुसत्या झाल्या. प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही. पुण्यात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे, अशा मागणीकडे वर्षभर दुर्लक्षच झाल्याची माहिती त्यांनी दिली. ससून रुग्णालयाला व्हेंटिलेटर, पुणे कॅन्टोमेंटसाठी रुग्णवाहिका, नेत्र विभागासाठी 15 लाख, 20 शाळांसाठी संगणक अशा प्रकारची कामे आमदार निधीतून केल्याचे त्यांनी सांगितले. विधी मंडळात मी मांडलेल्या प्रश्‍नांवर सरकारला कायदे करावे लागले वा धोरणात बदल करावे लागले. लिफ्ट कायदा बदलला, सायबर सेल सक्षम झाला, सोसायट्यांमध्ये पार्किंग जागेत 30 टक्के जागा मोकळी ठेवण्याचे बंधन आले, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्यानंतर पक्षात नवचैतन्य आले असून राहुल गांधी यांच्यामुळे पक्षाला सोनियाचे दिवस आले, अशी टिपणी गाडगीळ यांनी मांडली.