धुळे- केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जनमानसात असंतोष खदखदत असून याच असंतोषला वाट करुन देण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेवून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथुन सुरू झाला आहे. ही संघर्षयात्रा शनिवार, 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी धुळे शहरात येत असून या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष युवराज करनकाळ यांनी दिली. जनसंघर्ष यात्रा नंतर शहरातील हिरे भवन येथे जाहिर सभा होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या संदर्भात नियोजन करण्यासाठी येथील काँग्रेस भवनात बैठकीला मार्गदर्शन करतांना युवराज करनकाळ बोलत होते. भारतीय जनता पक्षाने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. खोटे बोलून विश्वासघात केल्याची जनतेची भावना झाली आहे. महिला, अल्पसंख्याक, विद्यार्थी, तरुण या सर्वच घटकांची सरकार विरुध्द नाराजी आहे. यानाराजीला व्यक्त करण्यासाठी काँग्रसेन ही जनसंघर्ष यात्रा काढली आहे.
यांची संघर्ष यात्रेत राहणार उपस्थिती
काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लीकार्जुन खळगे, माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते व्ही.के.पाटील, माजी. मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात ही संघर्ष यात्र शनिवार, 6 ऑक्टोबर रोजी धुळ्यात येत आहे. साक्रीमार्गे धुळ्यात येणार्या या संघर्ष यात्रेचे सुरत बायपास चौफुलीवर तसेच साक्री रोडवर ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता हिरेभवन येथे जाहीर सभा होणार आहे. या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांच्यासह पितांबर महाले, इस्माई पठाण, योगिता पवार, प्रभा परदेशी, मुकूंद कोवळले, शकिल अन्सारी, अरुण पाटील, बानुबाई शिरसाठ, अय्युब खाटीक, नोतनकुमार मिरचंदानी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.