काँग्रेसची पोलखोल झाल्याने देशाची राहुल गांधीनी माफी मागावी 

0
रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांची भावना
मुक्ताईनगर:- न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी करणारी याचिका सवोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. राहुल गांधींनी या विषयावर पत्रकार परीषद घेतली आणि जवळपास 150 खासदारांसह राष्ट्रपतींकडे जावून न्याय मागण्याचे ढोंग केले परंतु सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना न्या.लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच होता यामागे कोणताही कट नव्हता आणि ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असून ही याचिका म्हणजे न्यायपालिकेची बदनामी करण्याचा कट असल्याचे न्यायालयाने सुनावले. या निकालाने काँग्रेस व इतर साथीदारांची पोलखोल झाली आहे.
सत्याचा विजय, देशाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, काँग्रेसकडून वारंवार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरुद्ध षडयंत्र रचून त्यांचा अपमान करण्याचा व त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र शेवटी सत्याचाच विजय झाला.राहुल गांधींनी या प्रकरणात षडयंत्र रचून देशाचे वातावरण बिघडवण्याचा, न्याय व्यवस्थेच्या विश्वसनीयतेला डाग लावण्याचा आणि अमित शाह यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी देशाची माफी मागायला हवी. गांधी कुटुंबाला देशाच्या सरकारची दोरी त्यांच्या हातात राहिली पाहिजे, असे वाटते. जर कोणी गरीब किंवा मागासवर्गीय देशाची सेवा करू इच्छित असेल त्याला राजकारणात संपवण्याचा कट काँग्रेस करत असते. हे कृत्य अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून मी त्याचा निषेध करते.