नवी मुंबई । गुजरातच्या निवडणुकीमुळे तिथे दांडी यात्रेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळात देशभर काँग्रेसला पोषक वातावरण राहील, असे मत व्यक्त करून पनवेल काँग्रेसची मोट पुन्हा बांधण्यासाठी आज, ज्येष्ठांची विचार विनिमय बैठक संपन्न झाली. तळागाळातील कॉँग्रेसजनांना एकत्र आणण्यावर बैठकीत भर देण्यात आला. जिल्हा कॉँग्रेस विचार सेलचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या पनवेल येथील निवासस्थानी ही बैठक रमणिक शेठ माखेजा आणि ऍड. गजानन पाटील यांनी आयोजित केली होती. त्यावेळी पक्ष संघटनेला नवे रूप देण्यावर एकमत झाले.
कॉँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे, ती कधी संपुष्टात येणारी नाही. समाजधारेच्या अनुषंगाने जात असताना राजकीय पक्षांची पडझड होत असते, ती अनेकदा कॉँग्रेसची झाली. आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असा संदेश घेवून गावोगावी जावून पक्ष संघटना लवकरच नव्याने उभी करू या, असे मत उपस्थितांनी मांडले. स्थानिक पातळीवर काही वैचारिक मतभेद असू शकतात परंतु,कॉँग्रेस अभेद्य ठेवण्यासाठी ते मतभेद बाजूला सारून नजिकच्या काळात सर्वांना एका छत्राखाली आणण्याचे यशस्वी पर्यंत करू, या असा मतप्रवाह व्यक्त करण्यात आला. आबा खेर आणि शशिकांत बांदोडकर यांच्यावर जुन्या आणि निष्ठावंत कॉँग्रेसजनांची यादी तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच येत्या पंधरा दिवसात दूसरी बैठक आणि संघटना बांधण्यासाठी दिशा ठरविण्यात येईल,असे ठरले. त्यानुसार पक्ष बांधणीच्या दिशेने पहिले पाऊल आजच टाकण्यात आले.