नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्व सामान्य जनतेला चांगलाच फटका बसला असून गेल्या काही दिवसांत दरांमध्ये लागोपाठ वाढ होतच चालली आहे. त्यातच आता विरोधकांना सरकारच्या विरोधात चांगलंच हत्यार सापडलं आहे. काँग्रेसने वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांविरोधात 10 सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे.
या संदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी म्हटलं की,जनतेचा महागाई जीव घेत आहे. पेट्रोल डिझेल कंबरडं मोडत असून जनता त्रस्त आहे. या दरवाढीविरोधात 10 तारखेला भारत बंद राहणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपवर आंदोलन केलं जाणार आहे. मोदी सरकारमुळे कोणीच आनंदी नसून मोदी सरकार राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोकांमध्ये आक्रोश आहे. बंदबद्दल काँग्रेसची बैठक झाली असून आणखी काही विरोधी पक्षांशी चर्चा सुरु आहे.’