काँग्रेसचे राजू खानवाणींचा परिवारातील सदस्यांसह भाजपात प्रवेश

0

नंदुरबार । भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रविंद्र चौधरी यांच्यासह अनेक मान्यवारांच्या प्रयत्नानंतर शहर काँग्रेसचे पदाधिकारी राजू खानवाणी यांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार शहराध्यक्ष मोहन खानवाणी यांनी जाहीर केले आहे. आजपर्यंत काँग्रेसने घराघरांत नेहमीच भांडणे कशी लागतील आणि भावांची शक्ती कशी विभाजित होईल, यावरच का केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपातील नेत्यांनी मनोमिलन घडवून भाजपातील सौहार्द्रतेचे उदाहरण ठेवले असल्याचे म्हटले आहे.

डॉ. रविंद्र चौधरींच्या प्रयत्नांना यश
खानवाणी परिवार शहरातील प्रतिष्ठित आणि प्रतिथयश परिवारांपैकी एक गणला जाणार असून शहरातील सर्व स्तरातील लोकांशी या परिवाराचा संपर्क असल्याचे म्हटले आहे. अशा या परिवारातील सदस्य असलेले भाजपाचे शहराध्यक्ष मोहन खानवणी आणि त्यांचे बंधू राजू खानवाणी यांचे मनोमिलन व्हावे यासाठी ज्येष्ठ नेते हिरालालकाका चौधरी , खा. हिना गावित, आ. डॉ. विजयकुमार गावित, आ. शिरीष चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चांचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रविंद्र चौधरी आदी मान्यवरांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश मिळून नंदुरबार शहर काँग्रेसचे राजू खानवाणी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून भाजपाचे शहराध्यक्ष मोहन खानवाणी यांच्याशी हातमिळवणी करत भारतीय जनता पक्षांत प्रवेश केला आहे. याप्रसंगी रामचंद्र खानवाणी, राजकुमार खानवाणी, सुभाष खानवाणी, महेश खानवाणी आदी उपस्थित होते.