नितीन गडकरींचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई – राफेल विमान खरेदी प्रकरणावरून कॉग्रेसने भाजपविरोधात देशभर रान उठवले असतानाच कॉंग्रेसच्या अपप्रचाराला जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकत्र्यांना केले आहे. काँग्रेसकडून होणारे आरोप हे पूर्णपणे तथ्यहिन आहे. विमान खरेदीत कोणताही भ्रष्टचार झालेला नाही, काँग्रेसकडून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. वांद्रे येथे रंगशारदा सभागृहात भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यसमिती बैठकीचा गुरुवारी समारोप झाला.
हे देखील वाचा
या बैठकीला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार्यकत्र्यांना काँग्रेसच्या अपप्रचाराला जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले. राफेल विमान खरेदी प्रकरणी रिलायन्ससोबत २०१२ सालीच करार झाला होता. त्यावेळी तशा बातम्याही आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यात दुरान्वयेही संबंध येत नाही. दोन देशांमधील हा करार असून भारताला आज लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सची गरज असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील सिंचन प्रकपांसाठी केंद्र सरकारने ४० हजार कोटी रूपये मंजूर केले आहेत. हा निधी प्रकल्पांना तातडीने मिळावा यासाठी देखील पावले उचलण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न- पाटील दानवे
राफेलच्या विषयावर बोलताना खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस पक्ष केंद्र सरकारवर करत असलेल्या आरोपांमध्ये बिलकूल तथ्य नाही. राफेलविषयी झालेला करार भारत व फ्रान्स या दोन देशांच्या सरकार दरम्यान झाला होता. त्यामध्ये कंपनीचा काही संबंध नव्हता. या प्रकरणात कसलीही देवाणघेवाण झाली नसून काँग्रेसच्या आरोपांमध्ये कसलेही तथ्य नाही. या विषयी काँग्रेस पक्ष दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला देशात व महाराष्ट्रात सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करूनही सांगली व जळगाव महानगरपालिकांमध्ये भाजपाचाच विजय झाला. विरोधकांना भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा सापडत नसल्यामुळे त्यांनी दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी केले. आगामी निवडणूक शिवसेनेला सोबत घेऊन लढावी, असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनाही साथ देईल अशी आशा आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.