काँग्रेसच्या कामात ढवळाढवळ करू नका

0

लखनऊ । काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील प्रचारात अद्याप का उतरल्या नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करणार्‍या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर काँग्रेसने शुक्रवारी टीकास्त्र सोडले. प्रियांका गांधी या प्रचार करणार की नाही, ही सर्वस्वी काँग्रेसची बाब आहे, स्मृती इराणींनी आमच्या कामात नाक खुपसू नये, असा इशारा काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी दिला.

उत्तर प्रदेशात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागेल, या भीतीने प्रियांका गांधी प्रचारात उतरत नसल्याची टीका स्मृती इराणींना केली आहे. त्यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला. स्मृती इराणींनी आधी आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयीचे संभ्रम दूर करावेत आणि मग दुसर्‍याचे काय प्रश्‍न आहेत हे पाहावे. आपल्या शैक्षणिक पात्रतेसारख्या साध्या प्रश्‍नांची उत्तरे त्या देऊ शकत नसतील, तर त्यांनी राजकारणात राहू नये, असा टोला चाको यांनी लगावला.

प्रियांका गांधी अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांत प्रचार करतील, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्या या भागात अद्याप प्रचारात सहभागी न झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रम असल्याचे सांगण्यात येते. या भागात विधानसभेच्या एकूण 10 जागा असून, प्रियांका यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यातून त्यांना वेळ मिळणे केवळ अशक्य असल्यानेच त्या प्रचारात दिसत नसल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.