काँग्रेसच्या खासदारांचे निलंबन

0

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने कागदपत्रे भिरकावल्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या सहा खासदारांना निलंबित केले. गौरव गोगोई, के. सुरेश, अधीरंजन चौधरी, रंजीत रंजन, सुष्मिता देव आणि एम. के. राघवन अशी या सहा खासदारांचे नावे आहेत. हे निलंबन पाच दिवसांसाठी असणार आहे.

तथाकथित गोरक्षांकडुन होणारे हल्ले, जमावाकडून होत असलेल्या हत्या मुद्द्यावरून सोमवारी लोकसभेत कॉग्रेसच्या खासदरांनी गदारोळ केला. गोरक्षेच्या नावाखाली निष्पाप लोकांवर जीवघेणे हल्ले केले जात असल्याने देशात भीतीचे वातावरण आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. जमावाकडून हत्येच्या घटना वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा गोरक्षकांना इशारा दिला. मात्र त्यानंतरही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत, असे खर्गे म्हणाले. खर्गे यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करून याप्रश्नी चर्चेची मागणी केली. मात्र, ही मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळली. ही चर्चा शून्यप्रहरात घेतली जाईल, असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.
अनंतकुमार यांनीही सरकारच्या वतीने स्पष्टीकरण दिले.