पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विविध समित्या जाहीर केल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली असून स्थानिक पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. त्यात पुण्यातील सहा नेत्यांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी प्रसिद्धी समिती महत्त्वाची असून त्याचे अध्यक्षपद रत्नाकर महाजन यांना देण्यात आले आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद आमदार शरद रणपिसे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. माजी आमदार मोहन जोशी यांना निवडणूक समन्वय समितीचे सदस्यत्व देण्यात आले आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार अनंत गाडगीळ आणि माजी आमदार उल्हास पवार यांना निवडणूक प्रचार समितीचे सदस्यत्व देण्यात आले आहे. या नियुक्त्यांमुळे प्रदेश काँग्रेस समितीत पुण्याचे महत्त्व वाढले असे मानले जाते.