नवी दिल्ली-काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे आज बुधवारी सकाळी दिल्लीत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
गुरुदास कामत हे कामानिमित्त दिल्लीत गेले होते. बुधवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली होती.
गुरुदास कामत यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले असून ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असायचा. गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.
गेल्या काही वर्षांपासून मात्र गुरुदास कामत पक्षनेतृत्वावर नाराज होते. राहुल गांधी यांनी मुंबईसंदर्भात संजय निरुपम यांना झुकते माप दिल्याने ते नाराज झाले. त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामाही दिला होता. मात्र, काही दिवसांनी त्यांची नाराजी दूर झाली व ते पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.
गुरुदास कामत यांनी १९७२ मध्ये विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. १९७६ मध्ये त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपद भूषवले. १९८४ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. काँग्रेसप्रणित यूपीएच्या कार्यकाळात २००९ ते २०११ या कालावधीत ते केंद्रीय राज्यमंत्री होते. २०१४ मधील निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला होता.