काँग्रेसनेते बाबा सिद्दिकी यांची 462 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!

0

मुंबई । एसआरए घोटाळ्यातील आरोपी असलेले काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी 462 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. वांद्रेतील एसआरए योजनेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई केली आहे. वांद्रे रेक्लमेशनजवळील जमात ए जमुरिया झोपडपट्टी परिसरात ऑलिशान टॉवर बांधून बाबा सिद्दिकी यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवला आहे. ईडीने शुक्रवारी पीएमएलए कायद्यांतर्गत वांद्रे पश्‍चिमेला असलेली 462 कोटी रुपयांची त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.

बोगस कागदपत्रे केली तयार
ही सर्व मालमत्ता तीनवेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दिकी आणि पिरॅमिड डेव्हलपर्स या रिअल इस्टेट कंपनीची आहे. वांद्रे रेक्लेमशन येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीने बाबा सिद्दिकी आणि पिरॅमिड डेव्हलपर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिरॅमिड डेव्हलपर्सने एसआरए अंतर्गत विकास करताना अनियमितता केल्याचा आरोप आहे. त्यांनी बोगस कागदपत्रे तयार केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

2 हजार कोटी कमावले
प्रकल्प विकसित करताना पिरॅमिड डेव्हलपर्सने सॅट्रा ग्रुपला भूखंड विकला त्यानंतर दोघांनी संयुक्त विकास करार केला. त्यामध्ये समसमान फ्लॅट्स वाटून घेण्याचे ठरले होते. बाबा सिद्दिकी आणि पिरॅमिड डेव्हलपर्सने या आलिशान फ्लॅटसच्या विक्रीमधून 1800 ते 2000 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवल्याचा ईडीला संशय आहे. सिद्दिकी 2000 ते 2004 दरम्यान म्हाडाचे अध्यक्ष होते.