कल्याण : मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाला काँग्रेसकडून राज्यभरात विरोध होत असताना आता ठाणे तसेच कल्याणमध्ये काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी इंदू सरकारचा शो बंद पाडत आपला विरोध दर्शवला.
राज्यात सर्वत्र काँग्रेसच्यावतीने ’इंदू सरकार’ चित्रपटाच्या विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निषेध करूनही दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी चित्रपट प्रदर्शित केला. ठाणे येथील कोरम मॉलमध्ये काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चित्रपटाचा पहिल्या दिवशीचा पहिल्याच शो बंद पाडला.भारताची आयर्न लेडी इंदिरा गांधी आणि युवक काँग्रेस अध्यक्ष संजय गांधी यांच्या विषयी खोट्या गोष्टींचे चित्रीकरण करून चित्रपट बनविल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मधुर भंडारकर हाय हाय’ अशा प्रकारे घोषणाबाजी केली. ठाण्यातील कोरम मॉलमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला आपला निषेध दर्शवला आणि हा शो बंद पाडला.
ठाण्यात काँग्रेस आक्रमक
राज्यात आणि देशात जिथे जिथे हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, तिथे तिथे काँग्रेसचे पदाधिकारी हा चित्रपट बंद पाडणार, असे काँग्रेस पदाधिकार्यांनी सांगितले. तर इतर पक्षाच्या नेत्यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवल्यावर संबंधित पक्षाच्या पदाधिकार्यांना तो चित्रपट दाखवून मग तो प्रदर्शित करण्यात आला. मग इंदू सरकार हा चित्रपट काँग्रेस पदाधिकार्यांना न दाखवता प्रदर्शित केलाच कसा? असा सवाल यावेळी ठाण्यात केलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केला.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
भारताची आयर्न लेडी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या चरित्राचे हरण करण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून मुद्दाम डिवचत खोट्या गोष्टी दाखविण्याचे काम मधुर भंडारकर यांनी केले, असे काँग्रेस पदाधिकार्यांनी सांगितले. यावेळी कुठलाही प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करून काँग्रेसच्या 15 पदाधिकार्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर कोरम मॉलबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कल्याणात मेट्रो मॉलमध्ये काँग्रेस पदाधिकारी
कल्याणच्या मेट्रो मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजता ‘इंदू सरकार’ चित्रपटाचा पहिला शो होता. हा शो सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते आत घुसले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मोदी सरकार हाय हाय, मधुर भांडारकर हाय हाय..जब तक सूरज चांद रहेजा, इंदिरा तेरा नाम रहेगा अशा घोषणा देत हा शो बंद पाडला. तसेच मधुर भांडारकर यांच्या फोटोला चपला मारून काँग्रेस कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला.
आंदोलकांना घेतले ताब्यात
भाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करण्याचे काम करण्यात आले असून हा मधुर नव्हे तर मोदी भांडारकर असल्याची टिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली. या प्रकाराची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.