काँग्रेसने मुस्लिमांना केवळ मतांसाठीच वापरले

0

इंदापूर । 1885मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मुस्लीम समाजातील एक-दोघांना पदांची लालच दाखवून काँग्रेसने आजपर्यंत मुस्लीम मतांचा वापर केवळ मतांसाठी व स्वत:च्या फायद्यासाठीच करून घेतला. 1947 ला 33 टक्के मुस्लीम शासकीय सेवेत होते; तर सध्या फक्त अडीच टक्के मुस्लीम शासकीय सेवेत असून भाजप ओबीसींचा तर काँग्रेस मुस्लीम मतांचा वापर करून सत्तेत आला; परंतु मुस्लिम समाजाला कोणीही सत्तेत सामावून न घेता केवळ मतांसाठीच मुस्लिमांचा वापर काँग्रेसने करून घेतल्याने मुस्लिम समाजाची प्रगती खुंटली असून त्यांनी बहुजन समाजाबद्दल ‘वापरा आणि फेकून द्या’ या तंत्राचा वापर केला. त्यामुळे ‘भारत मुक्ती मोर्चा’ हा पर्याय असेल असे मत राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी भिमाकोरेगाव क्रांती स्मृृती द्विशताब्दी वर्षानिमित्त 1 जानेवारी, 1818च्या शूरवीरांना समर्पित करण्यासाठी इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

भिमाकोरेगांव द्विशतकी विजयी दिनानिमित्त बहुजन जागृती मेळाव्याचे आयोजन भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लीम मोर्चा व ऑल इंडिया एकता फोरमच्या वतीने मार्केट कमिटीच्या प्रांगणात करण्यात आले होते. बाळासाहेब पाटील, मुफ्ती शाकीर, मुफ्ती जुबेर, कोरणेश्‍वर स्वामी आदी उपस्थित होते.

सामाजिक लढा उभा करा
मुस्लीम मोर्चाचे मुफ्ती महमंद जुबेर म्हणाले की, मुस्लीम समाजाने सामाजिक न्याय हक्कासाठी एकत्र येऊन लढा उभा केला पाहिजे. दलित, मुस्लीम व बहुजन एकत्र आल्यास देशात कोणतेही सरकार पाडण्याची आणि त्यांच्या शिवाय सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे मुस्लीम समाजाची जबाबदारी आहे की दलित बहुजन वर्गाला सोबत घेवून सामाजिक लढा उभा करा असे सांगितले. सामाजिक आंदोलन निधी म्हणून आठ लाख रुपये वामन मेश्राम यांच्याकडे इंदापूर भारत मुक्ती मोर्चा युनिटच्या वतीने सुपूर्त करण्यात आले. सूत्रसंचलन संजय शिंदे यांनी केले, तर आभार तालुकाध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी मानले.

मात्र पेशवाई कशी आली?
मेश्राम म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजाच्या हत्येनंतर मोगलशाही सत्तेवर यायला पाहिजे होती; मात्र पेशवाई कशी आली? असा सवाल करीत प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी बहुजन समाजाचे आहेत पण आतापर्यंत बहुजन समाजाच्या विरोधातीलच निर्णय घेतले जात आहेत. याच्या पाठीमागील प्रस्थापितशक्ती ही देशातील बहुजन विरोधी आहे तर पंतप्रधान हे नामधारी असल्याचा घणाघाती आरोप केला.

मुस्लीम समाजाची 15 टक्के मते
ओबीसी समाज 52 टक्के आहे. त्यांना आता आपल्या हक्क अधिकाराबाबत जाणीव होऊ लागली आहे म्हणूनच भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा व पक्षाचा राजीनामा दिला आहे. देशातील काँग्रेसच्या मताची टक्केवारी 18.5टक्के आहे. त्यापैकी मुस्लीम समाजाची 15 टक्के मते आहेत. 60 वर्षे भाजप आणि हिंदूत्ववाद्याची भिती दाखवत सत्ता हस्तगत केली मात्र त्यांना हक्काच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम केले.