पुणे : हिंदी पट्टयात दणदणीत विजय मिळाल्याने काँग्रेस पक्षाचा बोलबाला वाढला आहे. त्याबरोबर पक्षात विधानसभेसाठी इच्छुक वाढले असून लोकसभेसाठीचे इच्छुक अधिकच सक्रीय झाले आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साडे तीन लाख मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील काँग्रेस पक्षाचे आठही उमेदवार पराभूत झाले होते तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अवघे नऊ नगरसेवक निवडून आले. सततच्या पिछेहाटीमुळे काँग्रेस कार्यकर्ता खचला होता. पक्षात तरुण वर्ग दिसत नाही, अल्पसंख्य समाज पक्षपासून दूर गेला या भावनेने पक्षात मरगळ होती. पक्षाच्या कार्यक्रमांनाही प्रतिसाद मिळत नव्हता. लोकसभा निवडणूक नजीक येऊनही उत्साह नव्हता.
परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात स्वबळावर निवडणूक जिंकल्यानंतर पक्षातील वातावरण बदलून गेले आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेले पक्षातील पाच नेते जोरात तयारीला लागले आहेत. तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे.
पुणेकरांचा कल काँग्रेसकडे दिसू लागल्याने इच्छुक वाढतील आणि याचा अनुकूल परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होईल, त्याही पक्षात इच्छुक जोर लावतील असे मत एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने व्यक्त केले .