काँग्रेसमध्ये नव्यांना संधी द्या; मागणीला जोर वाढला

0

पुणे – काँग्रेस पक्षातल्या जुन्या नेत्यांना बाजूला करून नवीन लोकांना, युवकांना संधी द्या अशी मागणी जोर धरीत असून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात याकरिता हिंमत दाखवतील का ? अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात चालू आहे.विधानसभेच्या निवडणुकीत कोणी नेता नसताना केवळ कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेना युतीशी झुंज दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिक्य कमी करण्यात यश मिळाले. सत्ता, पैसा, नेता नसताना लढल्याने पक्षात हुरुप आला आहे. काँग्रेसच्या दणक्याने शिवसेना पुण्यात मागे फेकली जाईलच पण भाजपनेही धसका घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा चिवटपणे लढत काँग्रेस देईल, अडिच वर्षांनंतर होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणखी ताकद दाखवेल. पण, याकरिता जुन्या नेत्यांना, गटबाजी करणारे आणि निष्क्रीय नेते बाद करण्याची आवश्यकता एका जबाबदार पदाधिकाऱ्याने बोलून दाखविली.काही नेते वयाची सत्तरी ओलांडलेले असून पक्षावरील पकड सोडण्याची तयारी नाही. त्यामुळे नवा युवा वर्ग काँग्रेसकडे येईना झाला आहे.आधुनिक विचारांचे प्रतिबिंब काँग्रेसच्या कारभारात सध्या उमटत नाही. भाजपच्या दैनंदिन कामकाजात इंटरनेटचा वापर केला जातो, याबाबत काँग्रेस मागे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये भाजपशी जवळीक असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपेक्षा काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना नगण्य आहेत.व्यापारी वर्ग, पेठांमधील पांढरपेशा वर्ग पक्षाकडे वळविण्यात अपयश आले आहे.पक्षाच्या कोपरा सभांना उत्सुकतेने तरुण येत होते, नेत्यांचे युक्तीवाद ऐकत होते. आता या तरुणाला पक्षात सामावून घ्यायला हवे या दृष्टीने कार्यक्रम आखण्याची गरज आहे. असंघटीत, बेरोजगार तरुणांसाठी संघटनेने दारे खुली करायला हवी. या तरुण वर्गाशी संवाद साधणारे नेते ही पुणे काँग्रेसची गरज आहे.