नवी दिल्ली :– काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले असून प्रियंका गांधी या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष बनू शकतात. नुकतेच सोनिया गांधी यांनी पक्षाच्या बैठकीत तसे सुचविल्याचे वृत्त ‘डीएनए’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दिल्लीत नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये उपस्थित असलेल्या एका सूत्राच्या हवाल्याने ‘डीएनए’ ने हे वृत्त दिले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी प्रियंकाचाच चेहेरा हवा याबाबत सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. प्रियंकाच्या मागे काँग्रेसमधील दिग्गजही ताकद उभी करणार आहेत.
काय ठरलं बैठकीत
भारत छोडो अभियानाच्या ७५ व्या स्मृतीदिनानिमित्त ८ ऑगस्ट रोजी बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वर्किंग कमिटीच्या बैठकीच्या अखेरीस हळूच नेतृत्वबदलाचा मुद्दा पुढे केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काही ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत सोनिया गांधी यांनी चर्चा केली आहे. सोनिया गांधी यांनी हा प्रस्ताव मांडला असता याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तापामुळे राहूल गांधी काँग्रेस कमिटीच्या बैठकिला अनुपस्थित होते. बैठकीत प्रियंका गांधीच २०१९ लोकसभा निवडणुकीत पक्षाचा चेहेरा असू शकतात यावर एकमत झाले.
काँग्रेसचा चेहेरा प्रियांकाच…
प्रियांका यांना पक्षात महत्वाची भूमिका द्यायला हवी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियंका गांधी यांनी केवळ अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघाच्या बाहेर पडल्या नव्हत्या. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी पक्षाची धुरा तरुण नेत्यांकडे द्यायला हवी, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. मात्र गांधी कुटुंबाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या काही निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला फारसे यश मिळालेले नाही. काही दिवसांपूर्वी परदेशातील निवडणूक सल्लागार कंपनी भारतात आली होती. तिच्या प्रतिनिधींनी यूपीएच्या काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. काँग्रेसकडून तो प्रियंका गांधी यांना भेटला होता.
गांधी घराणेच हवे…
एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने म्हटले की गांधी घराणे काँग्रेस पक्षाला जोडणारा धागा आहे. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान आणि सिताराम केसरी पक्षाध्यक्ष असतानाही गांधींना पक्षात सक्रीय होण्याची गळ घातली जात होती. काँग्रेसची नौका बुडू लागल्यावर सोनिया गांधींनी ती वर काढून काँग्रेस सत्तेत आली. गांधी घराण्याचा मतदारांवर प्रभाव पडतो, असे काँग्रेसमधील ज्येष्ठ म्हणतात. गांधी वजा काँग्रेस समीकरणाला कुणी पक्षातही स्थान देत नाही.