जळगाव । फैजपुर येथील काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचा इतिहास असलेल्या जिल्हा काँग्रेस कमेटीला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी व्यापक संपर्क अभियान राबवुन पक्षीय संघटनाच्या माध्यमातुन पक्षाला नवी उभारी मिळवुन देणार असल्याचा संकल्प प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला व्यक्त केला आहे. त्यांनी राजकारण, समाजकारण, आगामी काळात होणार्या निवडणुका यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, भाजप सर्व स्तरावर अपरशी ठरले असून या सरकारला पर्याय म्हणून देशात खा. राहुल गांधी यांनी पक्षाची सुत्रे हाती स्वीकारल्यानंतर राज्यातही खा. अशोक चव्हाण यांच्यासारखे डॅशिंग नेतृत्व पक्षाला लाभले आहे.
पक्षाला दुय्यम स्थान
याप्रसंगी बोलतांना प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, डिसेंबर 1936 मध्ये काँग्रेस पक्षाचे पहीले अधिवेशन ग्रामीण भागात झाले. त्यानंतर या जिल्ह्यात स्व. जे.टी.महाजन, स्व. मधुकरराव चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारखे दिग्गज नेत्यांनी या जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व केले. जळगाव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र नंतरच्या काळात जिल्ह्यात भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही पाय रोवले. केंद्रात आणि राज्यात सत्ता असुनही जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा विरोधकाच्याच भुमिकेत आत्तापर्यंत राहीला. मध्यंतरीच्या काळात काही नगरपरीषदांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होता. 1998 नंतर जिल्ह्यातील राजकीय परीस्थीती बदलली आणि काँग्रेस व राष्ट्रवादीतील जागा वाटपांमध्ये पक्षाला दुय्यम स्थान मिळाले.
खा. चव्हाण डॅशिंग नेतृत्व
सध्याच्या परीस्थीतीत केंद्रात आणि राज्यात आम्ही विरोधात आहोत. सत्ताधारी भाजपाकडुन सर्वसामान्य माणसांना मोठमोठी स्वप्न दाखविण्यात आली. मात्र एकही स्वप्न पूर्ण करण्याचे धाडस या सरकारने केले नाही. शेतकर्यांची कर्जमाफी, शेतमालाला भाव, नोकरदार वर्गाच्या समस्या, महिलांच्या समस्या बेरोजगारीचा प्रश्न या सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. सर्वसामान्य जनतेत या सरकारविरोधात असंतोष पसरत आहे.
निवडणुकांचा अजेंडा तयार
आगामी काळात होणार्या विधानसभा, लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने अजेंडा तयार केला आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, आ. भाई जगताप आणि प्रभारी विनायकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वत्र कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरे घेतली जात आहे. जळगावात हे शिबीर नुकतेच पार पडले. या शिबीराचे वैशिष्टय म्हणजे सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा पुर्ण वेळ शिबीराला उपस्थित राहीला. या शिबीराच्या माध्यमातुन राज्यातील आणि केंद्रातील सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षाला मानणार्या जुन्या आणि नव्या लोकांना पुन्हा जोडण्यासाठी व्यापक संपर्क अभियान वर्षभरात राबविले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.