चेन्नई : काँग्रेस म्हणजे कौटुंबिक मालमत्ता झालीय. काँग्रेससह अनेक पक्षात घराणेशाहीचे वर्चस्व वाढलेय. त्यांनी तरुण पिढीला सर्व दरवाजे बंद केले आहेत. म्हणूनच देशाला नव्या पक्षाची गरज आहे, असे वक्तव्य खुद्द काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांनी केले आहे.
पक्ष कौटूंबिक मालमत्ता झालेत
’जेनरेशन-67’ या त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमात कार्ती चिदंबरम यांनी काँग्रेसह सर्वच पक्षातील घराणेशाहीवर टीका केली. काँग्रेससह बहुतेक प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष कुटुंबांची खासगी मालमत्ता झालेत. त्यांच्यात काही सुधारणा होईल असे वाटत नाही. एखाद्या नवख्या माणसाला राजकारणात यायचे असल्यास हे पक्ष योग्य नाहीत. कारण, या पक्षांतून राजकारणात प्रवेश करायचा झाला तर पक्षप्रमुखांच्या किंवा पक्षातील बड्या नेत्यांच्या मागेपुढे करावे लागते, असेही कार्ती म्हणाले.
आयआयटी टॉपरला उमेदवारी का नाही
या कार्यक्रमात कार्ती चिदंबरम म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई किंवा आयआयटीच्या एखाद्या टॉपरला निवडणूक लढवण्याचे आमंत्रण दिले का? मग काँग्रेस असो वा भाजप. डीएमके असो की अण्णा द्रमुक असो, हे सगळे पक्ष कुटुंबांकडून चालवले जात आहेत. त्यात बाहेरच्या माणसाला अजिबात प्रवेश नाही. आमची संघटना म्हणजे कोणताही राजकीय पक्ष नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी आमच्या संघटनेचा संबंध नाही.