मध्यप्रदेशातील चित्रकुट विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुक जिंकण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली होती. पण निकाल काय लागला तो महित आहे. काँग्रेसने भाजप आणि शिवराज चौहान यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरताना ही जागा आपल्याकडे कायम राखली. भाजपचा हा पराभव राज्यात मागील 14 वर्षे सत्तेपासून लांब असलेल्या काँग्रेससाठी संजीवनीहून कमी ठरणार नाही. 2018 मध्ये राज्यात होणार्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी चित्रकुटची निवडणुक शिवराज सिंग यांच्यासाठी लिटमस टेस्ट होती. या चाचणी भाजपला पराभव मिळाल्यामुळे काँग्रेसचे समर्थक हा राज्यातील सत्तेत बदल होण्याचा संकेत मानत आहेत. या विजयामुळे मध्यप्रदेशात काँग्रेस कार्यकर्त्याचे मनोबल वाढले आहे. काँग्रेसचे राज्यातील प्रवक्ते रणदीप सिंग यांनी ट्विटर प्रतिक्रीया देताना म्हटले की, राज्यात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या मतदार संघात 2013 मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने 10 हजार 970 मतांनी विजय मिळवला होता.त्यावेळी काँग्रेसच्या उमेदावारला 45 हजार 913 मते मिळाली होती. तर भाजपला 34 हजार 970 मतदारांचा कौल मिळाला होता. यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत मतांचा फरक 14,333 इतका वाढला.
काँगेे्रसचे उमेदावार निलांश चर्तुवेदी यांना 66 हजार 810 मते मिळाली. भाजपचे उमेदवार शंकरदयाल त्रिपाठी यांना 52 हजार 477 मते मिळाली. भाजपने विशेषत: शिवराज सिंग यांनी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. प्रचाराच्या दरम्यान त्यांनी तीन दिवस या मतदार संघात मुक्काम ठोकला होता. 60 हून अधिक प्रचार सभा घेतल्या. आदिवासींवरील प्रेम दाखवण्यासाठी त्यांनी कुर्रा गावातील एका आदिवासीच्या घरात एक रात्र मुक्कामही केला होता. पण याच कुर्रा गावातून भाजपला अत्यंत कमी मते मिळाली. याशिवाय राज्यातील भाजपचे डझनभर मंत्री, एवढेच काय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अदित्यनाथ योगी प्रचार करता करता कामदगिरी मंदिराच्या पाच किलोमीटर अंतराच्या परिक्रमेत सहभागी झाले. याशिवाय त्यांनी चित्रकुटमध्ये दिपोत्सव आणि मंदाकिनी नदीच्या किनारी महाआरती केली. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी सभा घेतल्या. पण एवढे सगळे करुनही प्रभु रामंचंद्रांनी जिथे तपस्या केली ते चित्रकुट मात्र भाजपला जिंकता आले नाही. त्यामुळे हा पराभव भाजपसाठी मोठा फटका समजला जात आहे आणि सुस्त पडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मतमोजणीच्या 12 व्या फेरीनंतरच भाजपचे राज्यातील प्रमुख नंदकुमारसिंग चौहान आणि मुख्यमंत्र्यांनी, चित्रकुट हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सांगत पराभव मान्य केला. त्यामुळे चित्रकुट हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे माहीत होत तर ही पोटनिवडणुक भाजपने एवढी प्रतिष्ठेची का बनवली असा प्रश्न उपसि्थत होतोच.
दुसरीकडे या विजयामुळे कमलनाथ आणि विशेषत: ज्योतीरादित्य सिंदीया यांचे महत्व पुन्हा वाढले आहे. त्यामुळे काँग्रेस आता सिंदीया यांना राज्यात आपला चेहरा पुढे आणत आहे. भाजपसाठी आणखी एक धोक्याची घंटा पुढे आहे. राज्यातील शिवपुुरी जिल्ह्यातील कोलारस आणि अशोकनगर जिल्ह्यातील मुंगावली विधानसभा मतदार संघात विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणुका होत आहेत. चित्रकुटमधील पराभवातून भाजपने काही बोध घेतला नसेल तर त्यांच्यासाठी राज्यातील पुढील राजकिय वाटचाल कठिण होऊ शकते.
– विशाल मोरेकर
जनशक्ति प्रतिनिधी, मुंबई
9869448117