मुंबई : काँग्रेससोबत युती करायची आमची इच्छा आहे, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र येऊ शकत नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कारण, भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईतील पत्रकार परिषेत काँग्रेसचे कौतूक करताना राष्ट्रवादीवर कडाडून टीका करत संघ परिवार आणि मोहन भागवत यांच्यावरही त्यांनी निशाना साधला.
भारिप बहुजन महासंघाने आगामी निवडणुकांसाठी एआयएमआयएमसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना आंबेडकरांनी आज आपली भूमिका पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केली. शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत, पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. त्यांच्याच पक्षातील उदयनराजे भोसले संभाजी भिडेंचे जाहीरपणे कौतुक करतात. त्यामुळे प्रचाराला आम्ही कसं जाणार ? असा प्रश्न उपस्थित करत आम्ही कदापी राष्ट्रवादीसोबत युती करु शकत नाही.असेही त्यांनी स्पष्ट केलं
2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाला पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवली होती. राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे.असे आंबेडकर यांनी सांगत भारिप आणि एमआयएमच्या युतीचे समर्थन केले आहे. दरम्यान, काँग्रेसबरोबर आम्हाला युती करायची आहे. निवडणुकांतील अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत, पण काँग्रेसच्या मित्रांबरोबर नाही, असेही ते म्हणाले. एमआयएमसोबत युती करणार, निवडणूक लढवणार, आता मागे फिरणार नाही, असं म्हणत एमआयएमसोबतच्या युतीवर ठाम असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.