औरंगाबाद : काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी एका शेतकर्याला शेतात जाऊन मारहाण केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार आहेत.
अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकर्याला शेतात जाऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 13 जून रोजीची ही घटना आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार त्यांच्यासोबत असलेला पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्ते शेतात घेऊन गेलेले दिसत आहेत. शेतकर्याला अरोरावी करत धमकी दिल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मुक्तार शेख सत्तार असे या शेतकर्याचे नाव आहे. अब्दुल सत्तार माझ्या जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी दमदाटी करत असल्याचा आरोप शेतकर्याने केला आहे.
याप्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र एका लोकप्रतिनिधीने थेट शेतात जाऊन शेतकर्याला मारहाण केल्याने टीका केली जात आहे. कारण हवालदिल झालेल्या शेतकर्यावर त्याच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे ज्या लोकप्रतिनिधीला शेतकर्याने त्याचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे, त्याच लोकप्रतिनिधीची गुंडगिरी शेतकर्याला सहन करावी लागत आहे.