काँग्रेस उपाध्यक्षपदासाठी चव्हाणांना पसंती!

0

सोनिया गांधींकडून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड जवळपास निश्तिच; काँग्रेस अध्यक्ष निवड प्रक्रिया आजपासून; राहुल गांधी बिनविरोध निवडले जाणार?
मुंबई/नवी दिल्ली : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्याकडे लवकरच काँग्रेसच्या पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे जाणार आहेत. त्यांच्या मदतीला सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची उपाध्यक्ष म्हणून निवड जवळपास निश्चित केली आहे, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठस्तरीय सूत्रांनी दिली. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रकियेला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख 4 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे तर 5 डिसेंबरला अर्जांची छाननी करून दुपारी 3.30 वाजेपर्यंत वैध अर्जांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी राहुल हे एकमेव उमेदवार राहण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली.

राहुल गांधींना हवेत विश्वासू सहकारी!
पृथ्वीराज चव्हाण हे सोनिया गांधी यांच्याप्रमाणे राहुल गांधी यांचेही अत्यंत विश्वासू मानले जातात. पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री असताना त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा विश्वास संपादन केला होता. राहुल यांच्याकडून अध्यक्ष म्हणून काँग्रेसजनांना बर्‍याच अपेक्षा आहेत आणि ही कामगिरी बजावताना त्यांना अतिशय विश्वासू अशा सहकार्‍यांची गरज आहे. ही गरज ओळखून सोनिया यांनी पृथ्वीराज यांचे नाव निश्चित केल्याचे समजते. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री असताना पृथ्वीराज यांनी मनमोहन आणि सोनिया गांधी यांच्यातील समन्वयाची महत्त्वाची भूमिका निभावली होती. राष्ट्रीय राजकारणाचा बर्‍याच वर्षांचा अनुभव असल्याने त्यांची राहुल यांना मदत होऊ शकते, अशी सोनिया यांची अपेक्षा असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे, शनिवारपासून निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी एकमेव उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 डिसेंबरला राहुल गांधींची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून घोषणा होऊ शकते. अशाप्रकारे 9 आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात होणार्‍या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.

चव्हाण यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
काँग्रेसने दिलेली जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांनी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे पूर्ण केली आहे. याचमुळे त्यांना आदर्श घोटाळ्यानंतर स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून दिल्लीतून थेट महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठविण्यात आले होते. सोनिया यांच्या या निर्णयाला राहुल यांचा पाठिंबा होता. राहुल गांधी हे अध्यक्ष झाल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. धोरणात्मक निर्णय फार काळजीपूर्वक घ्यावे लागणार आहेत. दरम्यान, याबाबत आता पृथ्वीराज चव्हाण काय भूमिका घेतात याकडे राज्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबत काँग्रेसच्यावतीने कुणाचाही प्रतिक्रिया आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.