काँग्रेस कार्यकर्त्याने स्वतःला सिद्ध करावे – बाळासाहेब थोरात

0
सेवा , कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे उदघाटन
पुणे : देशातील राजकीय वातावरण बदलते आहे, अशावेळी एकसंघ  राहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री आणि काँग्रेस वर्कींग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केले.
काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे उदघाटन थोरात यांच्या हस्ते रविवारी पुण्यात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी खासदार कुमार केतकर, माजी खासदार रजनी पाटील, आमदार भाई जगताप, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते. सप्ताहाचे संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. पुणे शहर हे धर्मनिरपेक्षता, सलोखा, शांतता राखणारे शहर आहे. काँग्रेस पक्षाला हे शहर सहकार्य करेल असे यावेळी जोशी म्हणाले.
धर्मांधता, चुकीचे आर्थिक धोरण यामुळे देशात बदल दिसतो आहे. केंद्रातील मोदी सरकार पडू शकते पण त्यासाठी काँग्रेसने एकजुटीने लढले पाहिजे असे आवाहन सर्व वक्त्यांनी यावेळी बोलताना केले.
सत्ताधारी भाजप सरकारचे एकही भरीव काम दाखवू शकत नाही याकरिता आता धर्माचा आधार घेऊ पहात आहे. ही त्यांची निती काँग्रेस कार्यकर्त्यांनी समजावून घ्यावी असे थोरात यांनी सांगितले. थोरात यांच्या भाषणातील हाच धागा पकडून केतकर यांनीही आगामी चार सहा महिन्यात दंगली घडविली जाण्याची शक्यता व्यक्त केली. पुण्यात काँग्रेस पक्षाचाच उमेदवार लोकसभेला निवडून येईल असा आत्मविश्वास रजनी पाटील यांनी व्यक्त केला. डॉ. विकास आबनावे यांनी सूत्रसंचालन केले, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आभार मानले.