पासीघाटी-काल कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात जम्मू-काश्मीरसाठी असलेला ३७० कलम रद्द केले जाणार नाही, देशद्रोहाचा कलम रद्द केला जाईल, अफ्स्पा कायदा रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. यावरुन कॉंग्रेसवर टीका होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस देशद्रोहाबाबतचा कायदा रद्द करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगत ‘काँग्रेस का हाथ, देशद्रोहियों के साथ’, अशी टीका केली आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाटी येथील प्रचारसभेत मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा हे ढकोसलापत्र असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसने देशात फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, हिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच देशाला शिव्या देणाऱ्यासाठी योजना तयार केली. आमचा तिरंगा जाळणाऱ्यांना, ‘भारत के टुकडे होंगे’चा नारा देणाऱ्यांना, विदेशी शक्तींच्या हातचे बाहुले बनणाऱ्यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तोडणाऱ्याना काँग्रेसचे समर्थन असल्याचे सांगत पंतप्रधानांनी काँग्रेसला लक्ष केले.