‘काँग्रेस नगरसेवक आपल्या दारी’उपक्रम

0

पुणे । पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘काँग्रेस नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन कसबा-सोमवार पेठ प्रभाग क्र. 16 मध्ये दि. 14 ते 18 नोव्हेंबर 2017 या कालावधीत करण्यात आले असून या मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन ते तत्काळ निवारणासाठी प्रशासनाकडे पाठविण्याचा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी व नगसेविका आणि वृक्षसंवर्धन समितीच्या सदस्या सुजाता शेट्टी यांनी दिली. पाच दिवस चालणार्‍या या विशेष उपक्रमाचा समारोप आरोग्य शिबिराद्वारे होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेट्टी म्हणाले, नागरिकांच्या समस्यांचे निवारण व्हावे तसेच प्रशासकीय पातळीवर गतिमान कारभार व्हावा या उद्देशाने काँग्रेस नगरसेवक आपल्या दारी ही अभिनव योजना राबविली जाणार आहे. नागरिकांच्या सुलभतेसाठी आणि प्रशासकीय पातळीवर नागरिकांच्या समस्येचे निवारण होण्यासाठी अर्जांचे वितरणही या विशेष उपक्रमाच्या आधी होणार असून त्या-त्या दिवशी नागरिकांनी दिलेले अर्ज समक्ष नगरसेवकाच्या उपस्थितीत त्या-त्या तारखेला दुपारी 4 ते सायंकाळी 8 या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. दि. 14 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण प्रभागात प्रत्यक्ष नगरसेवक नागरिकांच्या भेटीला जाणार आहेत. सुमारे एक लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प असल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. दि. 19 नोव्हेंबरला स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सकाळी 10 वाजताआरोग्य शिबिराचे आयोजन करून सदाआनंद नगर येथे या समारोप होणार आहे.