नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींचे नाव घोषित करणार नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिले आहे. चिदंबरम म्हणाले, केवळ राहुलचा नाही तर इतर कोणाच्याही नावाचा दावा काँग्रेस पंतप्रधानपदासाठी करणार नाही.
चिदंबरम म्हणाले, आम्ही कधीही म्हटले नाही की राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवणार आहोत. ज्यावेळी काही काँग्रेस नेत्यांनी अशा प्रकारची मत व्यक्त केली होती, त्यानंतर काँग्रेसने याची दखल घेत अशी विधाने न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आम्हाला भाजपाला सत्तेतून दूर करायचे आहे. आम्हाला एक पर्यायी सरकार बनवायचे असून हे सरकार पुरोगामी असावे, त्यात व्यक्तिगत स्वातंत्र्याचा सन्मान होईल, टॅक्स टेररिझमला प्रोत्साहन दिले जाणार नाही, महिला आणि मुलांना संरक्षण दिले जाईल तर शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध राहिल. असे चिदंबरम यांनी म्हंटले आहे .
आम्हाला एक अशी आघाडी तयार करायची आहे, ज्यामध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्र बसून घेतील. गेल्या दोन दशकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या वोट बँकांमध्ये लुटमार करीत प्रादेशिक पक्ष मजबूत झाले आहेत. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा संयुक्त मतांची भागिदारी ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. प्रादेशिक पक्षांनी काँग्रेससोबत जाऊ नये यासाठी भाजपा भितीचे वातावरण निर्मितीचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी म्हटले होते की, जर सहकारी पक्षांनी पंतप्रधानपदासाठी आपल्या नावाला पसंती दिली तर आपण पंतप्रधान बनण्यास तयार आहोत. मात्र, सध्या आपले लक्ष्य केवळ भाजपाला सत्तेतून खाली खेचणे हेच असल्याचे त्यांनी राहुल यांनी म्हंटले होते.