डॉ.युवराज परदेशी: सन 2014 साली आलेल्या मोदी लाटेत होत्याचं नव्हतं झालेल्या काँग्रेसची अवस्था आता वर्चस्व नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करण्यापर्यंत आली. विशेषतः महाराष्ट्रात तर काँग्रेसची केविलवाणी अवस्था आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांचे मतभेद आणि गटबाजी हे सर्वश्रुत आहे. स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी जो -तो स्वतःपुरते पाहत असल्याने जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले मात्र वर्षभरापासून सरकारमधील कुरबुरु थांबलेल्या नाहीत. शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते दुय्यमस्थान देत असल्याची काँग्रेसनेत्यांची भावना आहे. याबाबत बाळासाहेब थोरातांनी अनेकवेळा दिल्लीवारी करुन गर्हाणी मांडली आहेत. काँग्रेसचा प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपासह मित्रपक्ष राष्ट्रवादी व शिवसेनेकडून होणारी कोंडी व कुरघोडी मोडीत काढण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रात भाकरी फिरवत शेतकरी हिताच्या मुद्यावरून काही वर्षांपूर्वी आमदारकीचा आणि नंतर खासदारकीचा राजीनामा देणारे आणि ओबीसी समाजाचे नाना पटोले यांना प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी दिली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पटोले यांच्या दिमतीला सहा कार्याध्यक्ष देण्यात आले आहेत. त्यात नव्या आणि जुन्या अशा नेत्यांचा समावेश आहे. ही पदे देतांना हायकमांडने प्रादेशिक समतोल देखील साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. 2019 च्या निवडणुकीपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि थोरात यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसमधून होत होती. गेले काही दिवस या पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांचेही नाव यात होते.
अखेरच्या क्षणी अमित देशमुख यांचंही नाव पुढे आले होते. मात्र, नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. थोरातांकडे आधीच खूप जबाबदार्या असल्याने त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार अन्य नेत्याकडे सोपविण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला असले, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. काँग्रेसची आजवरची रणनीती पाहिल्यास सत्तेची जबाबदारी असणार्या नेत्यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्षपद देण्याची जुनी प्रथा आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख अशा प्रत्येक प्रभावी नेत्यांना त्याचे फटके बसले. आता नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करत काँग्रेसने एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकार आणि भाजपची डोकेदुखी वाढत असतानाच नाना पटोले यांच्यासारखा धडाडीचा प्रदेशाध्यक्ष मिळाल्याने काँग्रेस संघटन मजबूत होईलच शिवाय भाजपची डोकेदुखीही वाढणार आहे. कारण जोखीम पत्करणे हा पटोले यांचा स्वभाव आहे. ते काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिले.
शेतकर्यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकार गंभीर नाही, असा आरोप करीत त्यांनी काँग्रेसची आमदारकी सोडली होती. शेतकर्यांच्या प्रश्नावर आमदारकी ठोकरणारा नेता अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये दाखल झाले व प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून जिंकले. पटोले भाजपमध्ये स्थिरावतील असे वाटत असतानाच, केंद्र सरकारची कृषीविषयक धोरणे आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि शेवटी ते भाजपमधून बाहेर पडले. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतरही त्यांनी पारंपारिक चौकटीबाहेर जात भाजपाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांच्या रुपाने आता विदर्भाला प्रदेशाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. यामुळे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शक्ती विभागली जाणार असून पवार, ठाकरे यांच्या बरोबर आता विदर्भातील पटोले यांच्याशी त्यांना दोन हात करावे लागतील. मात्र पटोलेंचा हा प्रवास सोपा नाही कारण त्यांना आधी पक्षांतर्गत गटातटाच्या राजकारणालाही सामोरे जावे लागणार आहे.
जर आपण गत आठ-दहा वर्षांच्या इतीहासात डोकावून पाहिले तर लक्षात येते की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर देशभरात झालेल्या निवडणुकांपैकी दोन-चार निवडणुकांचा अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमधील काँग्रेसची पीछेहाट हा निव्वळ योगायोग किंवा मोदी लाटेच्या राजकारणाचा परिणाम नाही. त्या स्थितीला काँग्रेसचे धोरण व स्वपक्षातील काही नेतेच जबाबदार आहेत. यामुळेच काँग्रेसला 2014 नंतर लागलेली घरघर, उतरती कळा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. देशाच्या 70 वर्षांच्या इतिहासात 50 वर्षापेक्षा जास्त सत्ताकाळ भोगणार्या काँग्रेसची सध्याची अवस्था खूपच खराब आहे. नेमकं काँग्रेसचे धोरण काय आहे? याबाबत कुणातही एकवाक्यता नाही.
केवळ विरोधाला विरोध म्हणून पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांना लक्ष केले गेल्यामुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक, भारत-चीन सीमेवरील तणाव, देशद्रोही कृत्य करणार्यांचे समर्थन, अशा अनेक चुका काँग्रेसला भोवल्या आहेत. यामुळे पटोलेंना अडथळ्यांची मोठी शर्यत पार करावी लागणार आहे. काँग्रेस हा विचार आहे असे मानून आयुष्य वेचणार्या अनेक पिढ्यांना आणि सध्या काँग्रेससोबत असणार्या अनेकांना आजही काँग्रेसबद्दल नितांत आदर आणि अपेक्षाही आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँगेसने कात टाकून पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरायचे असेल तर पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढत व हुजरेगिरी करणायार्यांना दूर ठेवावे लागणार आहे. तरच काँग्रेसला गतवैभव प्राप्त होवू शकते.