मुंबई : काँग्रेस पक्षाचे मुंबईतील एकेकाळचे वादळ समजले जाणारे गुरुदास कामत आता काँग्रेसच्या कॅनव्हासमधून बाहेर पडले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत निर्णयप्रक्रियेत कुठलेही स्थान न दिल्याने दोन महिन्यांपूर्वीच नाराजी उघड करणारे कामत यांची गुजरातच्या प्रभारीपदावरूनही उचलबांगडी करण्यात आली, त्यामुळे नाराज कामतांनी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
येत्या डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गड असलेल्या गुजरातमधील निवडणुका काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कामत यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते गेहलोत यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या टीममध्ये हिंगोलीचे खासदार राजीव सातव, धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड, बुलढाण्याचे आमदार हर्षवर्धन सकपाळ आणि मध्य प्रदेशातील आमदार जितू पटवारी यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कामत यांना अप्रत्यक्षपणे पडद्याआड टाकल्याचे स्पष्टपणे दिसले.
गुजरातबाबचा नेतृत्त्व बदलाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मला पक्षातील सर्व जबाबदार्यांतून मुक्त करावे, अशी मागणी मी स्वत: दोन वेळा राहुल गांधी यांच्याकडे केली होती. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाही तसे पत्र लिहिले होते. गेल्याच आठवड्यात राहुल गांधी यांच्याशी या संदर्भात भेट घेऊन मी चर्चाही केली होती.
गुरुदात कामत, काँग्रेस नेते.