काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिवाळी अधिवेशनात संयुक्त मोर्चा

0

मुंबई । राज्यातील भाजप-शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस येत्या 12 डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मंगळवारी येथे माहिती दिली. शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असूनही या मोर्चाला संबोधित करण्यासाठी शरद पवार स्वतः येणार आहेत. तसेच काँग्रेसचेही राष्ट्रीय पातळीवरचे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या आधीकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज्यात वेगवेगळी आंदोलन देखील होणार आहेत.

विधानपरिषदेची उमेदवारीबाबतही खल
विधानपरिषद निवडणूक एकाच जागेसाठी असल्याने निवडून येणासाठी 145 मतांची गरज आहे. काँग्रेसमुळेच यापूर्वी नारायण राणे यांची विधानपरिषदेत वर्णी लागली होती. मात्र आता ते विधानपरिषद निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादीची आजच्या बैठकीत उमेदवारीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. भाजपकडून विधान परिषद निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा निर्णय आहे. मात्र संख्याबळ आमच्या बाजूने आहे असे अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केल.

संघर्ष यात्रेनंतर पुन्हा आले एकत्र
भाजप – सेना सरकारविरोधात अधिवेशनामध्ये काय भूमिका घ्यायची आणि ते कसे पार पडायचे याबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. राज्य सरकार विरोधात विरोधकांनी संघर्ष यात्रा एकत्र काढल्यानंतर आता या बैठकीत अधिवेशनावर एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीला काँंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जयंत पाटील उपस्थित होते.