पुणे (खास प्रतिनिधी)- शिवसेनेने सत्ताधारी भारतीय जनता पक्षापासून काडीमोड घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आघाडी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्याशी दोनवेळा चर्चा केली असून, वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. पवारांनी शिवसेनेला सोबत न घेण्याचे सूतोवाच केले असले तरी, भाजपच्या जागा घटविण्यासाठी शिवसेनेला योग्य त्या मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेसची ताकद पुरविण्याचेही वरिष्ठ पातळीवर घाटत असल्याचेही हे सूत्र म्हणाले. सोमवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होत असून, या बैठकीनंतर पवार व खा. गांधी यांच्यातही आघाडीबाबत बोलणी होणार असल्याचेही हे सूत्र म्हणाले. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही लवकरच राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
गरज पडेल तेथे शिवसेनेला ताकद!
राज्य सरकारमधून लवकरच शिवसेना बाहेर पडणार असून, त्यानंतरच्या राजकीय रणनीतीची आखणी ज्येष्ठ नेते शरद पवार व काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दोन वेळा झालेल्या चर्चेत केली असल्याचेही हे वरिष्ठस्तरीय सूत्र म्हणाले. शिवसेनेने जाहीर केलेली भूमिका ही पूर्वनियोजीत व पुरेशी विचारपूर्वक असल्याचे हे सूत्र म्हणाले. आगामी निवडणुकीत जेथे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकणार नाहीत. तेथे शिवसेनेला ताकद देण्याचेही वरिष्ठ पातळीवरील चर्चेत निश्चित झाले असल्याचेही सूत्राने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मुंबईत आगामी निवडणुका आम्ही काँग्रेससोबत आघाडी करून लढणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांची राहुल गांधी यांच्याशी चर्चाही सुरु असून, सोमवारी (दि.29) दिल्लीत या संदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठकही होणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांत भाजपविरोधात लढण्याची रणनीती निश्चित केली जाणार आहे. शुक्रवारी देशभरात गणराज्यदिन साजरा होत असताना, दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईत विरोधी पक्षांनी संविधान बचाव मोर्चा काढला होता. या मोर्चात डावे पक्ष, तसेच प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले होते. यावेळी समानविचारधारा असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनदेखील केले होते. आपण एकत्र आलो नाही तर राष्ट्र व संविधानासाठी ते धोकादायक ठरेल, असेही पवारांनी सांगितले होते. या मोर्चाच्या निमित्ताने पवारांनी आपले जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आता राज्यात होत आहे.
चव्हाण म्हणतात, राज्यातील समीकरणे बदलणार!
संविधान बचाव मोर्चाच्यानिमित्ताने एकत्र आलेल्या माकपनेते सीताराम येचुरी, जदयूनेते शरद यादव, भाकपचे डी. राजा, गुजरात पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी यांच्यासह शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांचीही उपस्थिती होती. या सर्व नेत्यांची सोमवारी दिल्लीत व्यापक चर्चा होणार आहे. विरोधकांच्या या मोर्चाच्या विरोधात सत्ताधारी भाजपने तिरंगा बचाव यात्रा काढली होती. परंतु, तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असेही दिसून आले. भाजपविरोधात विरोधक एकत्र येत असतानाच, पुण्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील राजकारणाची समीकरणे लवकरच बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत देशाचे चित्र बदलण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली असून, नवी समीकरणे व गणिते मांडली जाणार आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले होते. लोकनेते संभाजीराव काकडे गौरव सोहळ्यात बोलताना त्यांनी पुढील समीकरणांवर सविस्तर भाष्यही केले होते.
.. तर नाथाभाऊ काँग्रेसमध्ये!
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले असले तरी, खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यासाठी खुद्द अजित पवार हेदेखील आग्रही आहेत. परंतु, राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण आणि उद्या सत्ता आली तर चांगली संधी पाहाता, एकनाथ खडसे हे काँग्रेसलाच प्राधान्य देतील, अशी शक्यताही वरिष्ठस्तरीय नेत्याने व्यक्त केली आहे. नारायण राणे हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसलाही खडसे यांच्यासारखा राज्य पातळीवर दबदबा असलेला नेता हवा आहे. त्या दृष्टीने खडसे यांनी पक्ष सोडण्याची तयारी दर्शविली तर ते काँग्रेसमध्येच दिसतील, असेही हे सूत्र म्हणाले.