औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची जीभ सोमवारी पुन्हा एकदा घसरली. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तुलना चक्क उंदरांशी केली. या कार्यकर्त्यांची अवस्था कोंडून ठेवलेल्या उंदरांसारखी झालेली आहे, ते भाजपकडे येण्यासाठी धडपड करत आहे, असे दानवेंनी सांगितले. कुणीही पक्षात येत असेल तर खुशाला त्याला पक्षात घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. तर भाजपच्या या इन्कमिंगवर विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी मात्र जोरदार टीका करत, खा. दानवेंचे कान उपटले. पूर्वी भाजपचा कार्यकर्ता घरी आला, की आनंद व्हायचा, पाहुणा घरी आल्यासारखे वाटायचे, आता अशा लोकांना पक्षात घेतले जात आहे की ज्यांच्यामुळे पक्ष बदनाम होत आहे, असा टोला बागडे यांनी खा. दानवेंना हाणला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 93व्या वाढदिवसानिमित्त औरंगाबादमध्ये दयाराम बसैय्येबंधू यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खा. दानवे व ना. बागडे यांनी उपरोक्त विधाने करून पुन्हा एकदा राजकीय वादाला तेल घातले आहे.
निष्ठावंत कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले : बागडे
सभापती बागडे म्हणाले, की भाजपमधील अनेक जुणे-जाणते आणि निष्ठावंत कार्यकर्ते सत्तेच्या साठमारीत दुर्लक्षित राहिले आहे. भाजपचा आज महावृक्ष झाला आहे, मात्र ज्यांनी खतपाणी घातले त्यांच्याकडेही लक्ष दिले पाहिजेत. 25 वर्षांपूर्वी जसे काम करत होतो तसेच काम आताही झाले पाहिजे, अशी खंतही बागडे यांनी बोलून दाखविली. पूर्वी तिकिट देताना किंवा पक्षात प्रवेश देताना अनेकदा चौकशी केली जायाची, आता तर कुणालाही सहजपणे प्रवेश दिला जातो, अशी टीका करत त्यांनी स्वपक्षीय नेत्यांचे चांगलेच कान उपटले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळाही दिला. तसेच, त्यांच्या जुन्या आठवणीही सांगितल्या. अगली बारी, अटलबिहारी या घोषवाक्याचे किस्सेही सांगण्यात आले. दीर्घ कालावधीनंतर देशात भाजपची लाट आली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे चांगले यश मिळत आहे, अशात मूळ विचार आणि हेतू जपला पाहिजे, असेही बागडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एक पाय जेलात!
याप्रसंगी बोलताना खा. दानवे यांची जीभ मात्र नेहमीप्रमाणे घसरली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उंदरांची उपमा दिली. या पक्षाच्या नेत्यांचा एक पाय बाहेर आणि एक पाय जेलामध्ये आहे. संध्याकाळ होईल आणि आपत्ती येईल, याची त्यांना भीती वाटते म्हणून ते दबाव आणण्याचे काम करत आहेत, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लगाविला. तसेच, उंदरांना कोंडून ठेवल्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर जसे हे उंदीर बाहेर पडतात तसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून लोकं बाहेर पडले आहेत. यातील बरेचजण भाजपकडे येतात, त्यामुळे गावात कुणीही पक्षात येत असेल तर त्याला बंधने घालू नका, पक्षात घ्या, असा सल्लाही खा. दानवे यांनी दिला.