राहुल जगताप (धुळे)- खान्देशात धुळे जिल्हा हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. जिल्ह्यातील पाच पैकी तीन आमदार हे काँग्रेसचे आहेत. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे तर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेसचे मातब्बर उमेदवार आ.अमरीश पटेल यांचा पराभव केल्याने काँग्रेसच्या अभेद किल्ल्यास पहिला धक्का बसला. मंत्री जयकुमार रावल यांनी देखील काँग्रेसच्या पराभव केला. भाजपा पक्षश्रेष्ठींनी धुळे जिल्ह्याला थेट एक केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री पद बहाल केले. त्यामुळे खान्देशात भाजपा पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी उर्जा निर्माण झाली. नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानीपत केल्यानंतर भाजपाचा मोर्चा धुळ्याकडे वळला आहे. महापालिका निवडणूकीच्या माध्यमातून भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेत शिरकाव करीत आहे. धुळे महापालिकेची निवडणूक ही जिल्ह्याच्या राजकारणात परिणाम करणारी आहे.
केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी पदीची सुत्रे स्विकारताच त्यांनी देशाच्या राजकारणात प्रवेश केला. असे असले तरी त्यांनी स्थानिक प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले. धुळ्यात असतांना त्यांनी थेट स्थानिक प्रश्नात हात घातला. धुळे शहरातील पाणी प्रश्नावर त्यांचे विशेष लक्ष होते. तेव्हा त्यांवर टीका सुध्दा झाली की, धुळ्यात उद्योग नाहीत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री स्थानिक स्वराज्य संस्थेत ढवळाढवळ करतात. जिल्हा नियोजन बैठक, आढावा बैठकींना मंत्री डॉ. भामरे आवर्जून उपस्थित राहत होते. त्यांचा परिणाम धुळे महापालिकेवर होणार आहे. दोन महिन्यापूर्वी झालेले अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करुन त्यांनी स्वकीय शिवसेना पक्षासह काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला समाजकारणाचा धडा दिला. सैन दलाचे प्रात्यक्षिक उपक्रमांने धुळ्यात त्यांची प्रतिमा अधिक उंचावली.
केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरे यांची कामाच्या पध्दतीमुळे धुळे महापालिकेत भाजपाला रंग चढला आहे. महापालिकेत भाजपाचे केवळ 3 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष असून शवसेनेचे 10 नगरसेवक आहेत. असे असतांना सुध्दा भाजपाने राष्ट्रवादी पक्षातील निर्णयप्रक्रियेत असणारे माजी. महापौर, शहर जिल्हा अध्यक्ष, नगरसेवकांना आपल्या छावणीत आणले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या टीमला घेवून भाजपा महापालिका निवडणूकीच्या मैदानात उतरला आहे. जिल्ह्यात कोणत्याही पध्दतीची लाट नाही. तरी देखील भाजपाकडे जाणार्यांचा लोंढा वाढत आहे. भाजपात प्रवेश करुन महापालिकेचे तिकीट नाही मिळाले तर त्यांचा परिणाम मतदानावर होणार आहे. हे निश्चित.
महापालिका निवडणूकीची विशेष बाब म्हणजे शहर हद्दवाढ झाली आहे. 11 गावांचा समावेश महापालिकेत झाला आहे. त्यामुळे ग्रामीण काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी शहरातील राजकारणात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादीचे प्रमुख माजी. आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी अनेक नगरसेवकांना मोठी पदे दिलीत. मात्र त्यांना सोडून अनेकांनी भाजपात प्रवेश केला आहे. असे असले तरी कदमबांडे हे खंबीरपणे उभे आहेत. परिणामी त्यांना जनतेची सहानुभूती मिळत आहे. मुस्लिम आणि दलित वर्गांत त्यांना मानणारा एक वर्ग आहे. मराठा आणि ओबींसी समाजात त्यांची प्रतिमा चांगली आहे.
दुसरीकडे भाजपाचे आमदार अनिल गोंटे यांनी तर स्वपक्षींची झोप उडविली आहे. मंत्री गिरीष महाजन यांना थेट विरोध केला आहे. मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यावरही सूड उगविला आहे. राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश आणि जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीष महाजन यांना धुळ्यातील काय कळत असा ही टोला लगावत त्यांनी भाजपाची सूत्रे स्वतःहाती घेतली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनात पुन्हा भाजपासाठी अर्ज विक्रीसाठी दिले आहेत. तर मंत्री गिरीष महाजन उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये संभ्रम झाला आहे. की, खरी भाजपा कोणती, आमदार गोटे यांच्याकडे जावे की, मंत्री सुभाष भामरे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे. ह्या स्थितीचा भाजपाच्या मतदानावर परिणाम होणार आहे. एकेकडे आ.अनिल गोटे स्वपक्षातील मंत्र्याविरुध्द आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे शिवसेना देखील भाजपापासून दुरावली आहे. त्यामुळे भाजपा विरुध्द आ.गोंटेचा भाजपा आणि काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा संघर्ष सुरु झाला आहे.